होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात खबर्‍याच निघाला ड्रग्ज माफिया

ठाण्यात खबर्‍याच निघाला ड्रग्ज माफिया

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:11AM

बुकमार्क करा

ठाणे : नरेंद्र राठोड

दोन हजार कोटींच्या इफेड्रिन प्रकरणात ठाणे पोलिसांना टीप देणारा कोमिल अन्वर अली मर्चंट हा खबरीच ठाण्यातील सर्वात मोठा अमली पदार्थांचा तस्कर निघाला असून त्याने मुंब्य्रात एमडी विक्रीचे जाळेच विणल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. त्याच्याविरोधात मुंब्य्रातील मौलवींनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केल्याने पोलिसांनी दोन आठवड्याच्या तपासानंतर गोव्यातून कोमिलच्या मुसक्या आवळल्या.

इफेड्रीनची टीप दिल्यानंतर कोमिलचा मुंब्य्रात प्रचंड दहशत वाढली होती. मौलीवींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटकेसाठी जंग जंग पछाडले मात्र तो दोन आठवडे पोलिसांना गुंगारा देत राहिला. अखेर त्यास 15 डिसेंबरला गोव्यातून अटक करण्यात आली. 

कोमिल अमली पदार्थ तस्करीच्या व्यवसायात असूनदेखील अंगावर दीड ते दोन किलो सोन्याचे दागिने घालून अगदी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या कॅबिनमध्ये विना परवानगी सर्रास प्रवेश मिळणारा हा गुन्हेगार. पोलीस दप्तरी शेकडो तक्रारी, अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग, एमडी पॉवडर सारख्या घातक अमली पदार्थाचा तस्कर, लाखो तरुणांचे आयुष्य अमली पदार्थामुळे अंधकारमय करणारा नराधम असे असूनदेखील कोमिल मर्चंड म्हणजे पोलिसांचा खास माणूस असा त्याचा सर्वत्र दबदबा होता. अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांच्या टीप पोलिसांपर्यंत पोहोचवून कोमिल याने मुंब्रा आणि ठाण्यातून आपले सारे प्रतिस्पर्धीच हटवून टाकले. त्यानंतर कळवा, मुंब्रा परिसरातील तो एकमेव अमली पदार्थ विक्रीतला बादशाह बनला. तर दुसरीकडे कोमिल देत असलेल्या टीपमुळे अनेक अमली पदार्थ तस्करीच्या केसेस ठाणे अमली पदार्थ विरोधी पथक उघड करून आपली पाठ थोपटून घेत होते. 

डायघर येथे पकडण्यात आलेला चिनाय हा नायजेरियन अमली पदार्थ विक्रेता असो वा मागील वर्षी ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने 2 हजार कोटींचे सोलापूरहुन जप्त केलेले इफेड्रीन या सार्‍यांची माहिती कोमिलनेच पोलिसांना दिल्या होत्या. कोमिलमुळे अनेक केसेस उघड होत असल्याने पोलिसांनी देखील त्याच्या अमली पदार्थ तस्करीकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान कोमिल मर्चंड नावाचा माणूस आपल्या मुलांचे आयुष्य नशेच्या अंधकारात लोटत असल्याचे मुंब्रावासियांच्या लक्षात आले. मुंब्रामधील नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मौलवींनी कोमिल विरुद्ध अनेक तक्रारी पोलीस दरबारी केल्या. मात्र आपण पोलिसांचे खास खबरी असून कोणीच आपले काही वाकडे करू शकत नाही असा तोरा कोमिल नेहमीच मिरवायचा. 

त्याचा दबदबा इतका वाढू लागला की तो मुंब्रा, कळवा भागातील अनेक राजकीय नेत्यांच्या संपर्कात आला. या राजकीय नेत्यांची त्याला साथ मिळू लागली. तसेच कोणी त्याच्या विरोधात तक्रार केली तर त्याची खबर थेट पोलीस मुख्यालयातून त्याला त्वरित मिळत असे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडे कोणी तक्रार करण्यास गेला की, त्या तक्रारकर्त्याच्या आधी हा कोमिल हातात चार चार आयफोन आणि अंगावर सोन्याचे दागिने चढवून त्या अधिकार्‍यांच्या कॅबिनच्या बाहेर उपस्थित व्हायचा. 

मात्र, काही दिवसांपूर्वी या अमली पदार्थ तस्कराच्या विरोधात मुंब्रावासियांनी एकजूट होत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली. तसेच मुंब्रा शहरात जागोजागी बॅनर लावून त्याचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली. या घडामोडीनंतर पोलिसांवर दबाब वाढू लागला आणि अखेर कोमिलविरुद्ध अमली पदार्थ विरोधी पथकाने 14 नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्या मुसब्बीर हमजा माटणकर (32), मोहंमद शयान अब्दुल सुकर खान (41) व सिराज शेख नासिर मुन्शी या तिघांना अटक केली. मात्र कोमिल त्यावेळी फरार झाला होता. तब्बल एक महिना शोध घेतल्यानंतर अखेर 15 डिसेंबर रोजी कोमिल यास अमलीविरोधी पथकाने गोव्यातून अटक केली. त्यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.