Fri, May 24, 2019 06:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लंकेश हत्येतील दोघांना स्फोटकप्रकरणी एटीएसची अटक

लंकेश हत्येतील दोघांना स्फोटकप्रकरणी एटीएसची अटक

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:08AMमुंबई : प्रतिनिधी

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी)अटक केलेल्या आरोपींपैकी दोघांचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताबा घेत नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केली आहे. सुजीत कुमार आणि भरत कुरणे अशी या आरोपींची नावे असून आरोपी वैभव राऊत याच्या चौकशीतून दोघांची नावे समोर आल्यानंतर एटीएसने बुधवारी ही कारवाई केली. या दोघांनाही विशेष सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एटीएसच्या औरंगाबाद कक्षाने जालन्यातून एकाला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे.

राज्यामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत  असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री  नालोसोपार्‍यातील भंडारआळीमध्ये छापेमारी करत गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या साहित्यासह वैभव राऊत याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्यापाठोपाठ एटीएसने शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासूदेव सुर्यवंशी आणि लीलाधर ऊर्फ विजय लोधी अशा सात जणांना अटक केली होती. यापैकी राऊतच्या चौकशीतून बेळगावातील कुमार आणि कुरणे यांची नावे समोर आली होती. कर्नाटक एसआयटीने पत्रकार लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेले हे दोघेही न्यायालयीन कोठडीमध्ये होते. कर्नाटकातील स्थानिक न्यायालयाकडून ताबा घेत एटीएसने दोघांनाही अटक करत बुधवारी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयासमोर हजर केले. दोन्ही आरोपी राऊतच्या संपर्कात होते. दोघांनीही यापूर्वी अटक केलेल्या अन्य आरोपींसोबत शस्त्र चालविणे, बॉम्ब बनविणे याचे प्रशिक्षण घेतल्याची दाट शक्यता आहे. तसेच पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावेळी बेळगावातील प्रकाश चित्रपट गृहाबाहेर बॉम्बस्फोट घडविण्याच्या कटात सहभागी असल्याच्या शक्यतेतून दोघांकडेही कसून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद करत दोघांनाही जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी एटीएसच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. 

राऊत याच्या चौकशीतून या दोघांची नावे समोर आली होती, राऊतची दहा दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर दोघांनाही अटक करण्यात एटीएसने एवढा वेळ का लावला, असा सवाल करत अ‍ॅड. संजीव पुन्हाळेकर यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. तसेच दोघांनाही अटक केल्यानंतर कर्नाटक एसआयटीने त्यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यामुळे दोघांनाही कमीत कमी कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पुन्हाळेकर यांनी न्यायालयाकडे केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.