Fri, Apr 26, 2019 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचप्रकरणी पालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना अटक 

लाचप्रकरणी पालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना अटक 

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:29AM मुंबई : प्रतिनिधी

झाडे तोडण्याची परवानगी दिल्यानंतर एका कंत्राटदाराकडे 35 हजार रुपयांची मागणी करत 20 हजार रुपयांची लाच घेताना दहिसर येथील पालिकेच्या आर-उत्तर विभाग कार्यालयातील पालिकेच्या राजेश सुधाकर परब, सदानंद मोहन चव्हाण या दोन कर्मचार्‍यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

दोघांच्या अटकेने कर्मचारीवर्गात एकच खळबळ उडाली होती. तक्रारदार हे झाडे तोडण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. दहिसर येथील लायन एस. पी. जैन परिसरातील झाडे तोडण्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांना एक कंत्राट मिळाले होते.  त्यांनी आर पश्‍चिम विभागाकडून रितसर परवानगी केली होती. याबाबतची परवानगी देऊन मदत केल्याबद्दल त्यांच्याकडे 35 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

त्यापैकी 30 हजार सदानंद परब तर 5 हजार रुपये राजेश परब यांच्यासाठी मागण्यात आले होते. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी 20  हजार रुपये देण्याचे मान्य करून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी सदानंद चव्हाण, राजेश परब या दोघांनाही अधिकार्‍यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. यातील सदानंद हे उद्यान विद्या सहाय्यक तर राजेश श्रमिक म्हणून तिथे कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.