होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षावाल्याच्या चॉपरहल्ल्यात दोन जखमी

रिक्षावाल्याच्या चॉपरहल्ल्यात दोन जखमी

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:10AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उन्मत्त रिक्षावाल्यांचे कारनामे लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमधून समोर आले आहे. एक। घटनेत रस्त्याने आपल्या मित्रासह पायी चाललेल्या एका तरुणाला रिक्षावाल्याने भरधाव वेगाने रिक्षा चालवून कट मारला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षावाल्याने साथीदाराच्या मदतीने या दोन्ही तरूणांवर चॉपरच्या साह्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवलीतील स्कायवॉक खाली घडली. तर दुसर्‍या घटनेत कल्याणमधील रिक्षावाल्यांनी अपहृत प्रवाश्याला निर्जनस्थळी नेऊन लुटल्याची घटना घडली आहे.

पूर्वेकडे मानपाडा रोडला सांगाव येथील यशगंगा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा नरेंद्र पाटील हा शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागिय कार्यलयानजीक असलेल्या रिक्षा स्टॅण्ड लगत आपल्या मित्रासह चालत जात होता. इतक्यात अचानक एका भरधाव वेगाने येणार्‍या रिक्षाने त्यांना कट मारला. याचा पाटील यांनी सदर रिक्षावाल्याला जाब विचारला. मात्र संतापलेल्या रिक्षावाल्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रिक्षात लपवून ठेवलेला धारदार चॉपर काढून हल्ला केला. यावेळी पाटील याच्या मदतीला आलेल्या आयुब शेख या मित्रावरही चॉपरने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेही मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात पाटील याने हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.