होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉच्या एकाच दिवशी दोन परीक्षा

लॉच्या एकाच दिवशी दोन परीक्षा

Published On: May 05 2018 1:22AM | Last Updated: May 05 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा विद्यापीठाने ठेवल्याने ते वेळापत्रक बदलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली असताना तसाच गोंधळ पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे लॉ अभ्यासक्रमाची सेमिस्टर 5 ची परीक्षा आणि एलएलएमची सीईटी एकाच दिवशी येत असल्याने पुन्हा परीक्षांचा गोंधळ उडाला आहे. याविरोधात शनिवारपासून आंदोलन होणार आहे. 

लॉ शाखेत मास्टर्स कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एलएलएम करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा कल एलएलएमची सीईटी देण्याकडे असतो. मात्र एलएलबीची सेमिस्टर 5 ची परीक्षा आणि सीईटीची परीक्षा एकत्रच आल्याने विद्यार्थी ही परीक्षा देणार कशी असा प्रश्‍न उपस्थित करत एलएलएमची सीईटी पुढे ढकलण्याची मागणी स्टुडन्ट लॉ कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेचा निकालाचा प्रश्न गेल्या दोन सत्रांपासून गंभीर बनला आहे. कोणत्याही परीक्षांचे निकाल 45 दिवसांच्या आत जाहीर झालेले नाहीत. या शाखेच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीसाठी प्राध्यापक मिळत नाहीत. विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकन निकालासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली. लॉ शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करीत विद्यापीठाविरोधात आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. कालीना संकुलातील महात्मा फुले भवनाजवळ स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे विद्यार्थी आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.  

एलएलएमचे विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

 एलएलएम सेमिस्टर 3 मध्ये हयुमन राईटस लॉ, ग्रुपमध्ये 76 विदयार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 22 विद्यार्थ्यानां प्रॅक्टीकल परीक्षेत 100 गुणांपैकी 50 पेक्षा कमी मार्क देवून विद्यापीठाने नापास केल्याची तक्रार विद्यापीठाने केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट अ‍ॅड यज्ञेश कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी घेतली. 

Tags : Mumbai, Two, exams, same, day, Law