Wed, Nov 21, 2018 21:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई मेट्रोच्या खोदकामात सापडले गावठी बॉम्ब!

मुंबई : मराठा मंदिर परिसरात गावठी बॉम्ब!

Published On: Jan 11 2018 9:39AM | Last Updated: Jan 11 2018 9:44AM

बुकमार्क करा
मुलुंड : प्रतिनिधी

मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर परिसरात मेट्रोच्या खोदकामावेळी बुधवारी दुपारी एका डब्यामध्ये बॉम्ब सदृष्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागपाडा पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्‍वान पथक, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) घटनास्थळी धाव घेत केलेल्या तपासणीमध्ये फटाक्यांची पावडर, खिळे आणि दगड आढळून आले असून तो गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे सर्व नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती मिळते.

मुंबई मेट्रोच्या कामासाठी शहरात विविध ठिकाणी खोदकाम सुरू असून बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास मराठा मंदिर परिसरात खोदकाम सुरू असताना जमिनीच्या दोन मीटर खाली एका डब्यामध्ये बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली. खोदकाम करत असलेल्या कर्मचार्‍यांनी तत्काळ याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना दिली. या अधिकार्‍यांकडून माहिती मिळताच स्थानिक नागपाडा पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्‍वान पथक आणि एटीएसच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान दोन गावठी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. यातील एक बॉम्ब निकामी केल्यानंतर यात फटाक्यांची पावडर, खिळे, आणि दगड आढळून आले.

या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे नागपाडा पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संबंधित ठिकाणी काही काळ खळबळ उडाली होती. हे बॉम्ब नक्की कधीपासून गाडले गेले असावेत, याबाबतची माहिती आता घेतली जात आहे.