Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन कोटी ४० लाखांच्या सोने चोरांना अटक

दोन कोटी ४० लाखांच्या सोने चोरांना अटक

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 12:51AMमुंबई : प्रतिनिधी

शुद्ध करण्यासाठी दिलेले 2 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे कच्चे सोने घेऊन पसार झालेल्या चार जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मानखुर्दच्या टी जंक्शनवर एका कारमधून या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी सोलापूरमधील एका शेतातील गोठ्यामध्ये लपविलेले 1 कोटी 55 लाखांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

काळबादेवीतील सोने व्यापारी देवेंद्र बाफना यांनी नेहमीप्रमाणे 21 जुलैला मॅनेजर प्रकाश सिंग याला सांगून सोने कारागीर अमोल लवटे आणि त्याचा साथिदार संदीप लवटे यांना बोलावून घेतले. दोघेही पोहचताच बाफना यांनी त्यांच्याजवळ तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे 8 किलो 923 ग्रॅम कच्चे सोने शुद्ध करण्यासाठी दिले. लवटे हे सोने घेऊन त्यांच्या कॉटन एक्स्चेंज येथील कारखान्यात जाण्यासाठी निघाले. तेव्हा बाफना यांनी त्यांच्याकडे नोकरी करत असलेल्या कुंदर सिंह याला सोबत पाठविले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात हातात पडलेले सोने बघून संदीप आणि अमोलची नियती फिरली. त्यांनी सोने चोरी करुन पसार होण्याचा प्लॅन वाटेतच आखला. ठरल्याप्रमाणे कारखान्यामध्ये सोने शुद्धीकरणाची प्रक्रिया मध्यरात्री सुरु करण्यात आली. तेव्हाही कुंदर सिंह कारखान्यात उपस्थित होता. पहाटे पाचच्या सुमारास कुंदर सिंह याला झोप लागली आणि हीच संधी सांधून संदीप आणि अमोलने त्यांच्या आणखी एका साथिदाराच्या मदतीने हे सोने घेऊन पळ काढला. पळ काढताना आरोपींनी कारखान्याला बाहेरुन कडी लावली होती. नेहमीप्रमाणे साफसफाईसाठी आलेल्या कामगाराने कारखान्याच्या दरवाजावरील बेल वाजविल्यानंतर कुंदर सिंहला जाग आली.

तेव्हा सोने घेऊन संदीप आणि अमोल पसार झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच फोन करुन घडलेली घटना बाफना यांना सांगितली. बाफना यांनी कुंदर सिंहला सोबत घेऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष दोनकडे वर्ग करण्यात आला.कक्ष दोनचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. हे आरोपी मानखुर्दच्या टी जंक्शनवर एका कारमधून येणार असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अमोल आणि संदीप लवटे यांच्यासह अप्पा घेरडे आणि पोपटराव आटपाडकर यांना स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेत अटक केली.