होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसी लोकलमध्येही महिलांसाठी दोन डबे राखीव

एसी लोकलमध्येही महिलांसाठी दोन डबे राखीव

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 1:18AM



मुंबई : प्रतिनिधी 

8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो, मात्र या महिला दिनापूर्वीच पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांना अनोखी भेट दिली आहे. सोमवारपासून वातानुकूलित लोकलमधील दोन डबे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. वातानुकूलित महिला राखीव बोगी महिला प्रवाशांना सहजपणे ओळखता यावी म्हणून या बोगीला हिरवा रंग देण्यात आला आहे.

सर्वसामान्य लोकलप्रमाणे वातानुकूलित लोकललाही महिला प्रवाशांसाठी राखीव डबा असावा, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये महिला राखीव डबा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना वातानुकूलित लोकलबाबत हरकती आणि सूचना ऑनलाईन नोंदवता याव्यात, यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यवस्था केली आहे. सद्य:स्थितीत 300 पेक्षा जास्त प्रवाशांनी हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 27 टक्के प्रवाशांनी एसी फेर्‍या वाढवा, अशा सूचना केल्या आहेत. तसेच एसी लोकलला अतिरिक्त थांबा द्यावा, मासिक प्रथम वर्ग पास वगळता अन्य पासधारकांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशा विविध सूचनाही करण्यात आल्या आहेत. एसी लोकलच्या दोन्ही दिशेला महिलांसाठीचा राखीव डबा निश्चित करण्यात आला आहे. सध्या वातानुकूलित लोकल निळ्या आणि चंदेरी रंगात आहे. प्रवाशांना चटकन महिला डबा ओळखता यावा यासाठी राखीव डब्यांना हिरवा रंग देण्यात आला आहे.