Mon, May 27, 2019 00:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकिनाका येथून अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण

साकिनाका येथून अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

घरासमोरच खेळत असलेल्या एका अडीच वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन पळून गेलेल्या 28 वर्षीय आरोपीस काही तासांत साकिनाका पोलिसांनी अटक केली. संदीप शशिकांत परब असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला विशेष सेशन कोर्टाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपी पकडला गेला असून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. 

तक्रारदार हे साकिनाका परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक बेकरी आहे. त्यांना अडीच वर्षांची एकुलती एक मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही मुलगी घरासमोरच खेळत होती. यावेळी तिचे अज्ञाताने अपहरण केले. हा प्रकार नंतर तिच्या पालकांना समजताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली. यावरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये संदीप परब हा या मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. संदीप हा तिथेच बर्फाची लादी पुरवण्याचे काम करीत असल्याने त्याला तक्रारदार ओळखत होते.

संदीप त्याच परिसरात राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. संदीपचा शोध सुरु असताना रात्री अकरा वाजता त्याला साकिनाका परिसरातून पोलिसांनी अटक केली तर या मुलीला कुर्ला येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंग व पोस्कोच्या कलमांतर्गत कारवाई केली. दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.