Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तेवीस हजार कंत्राटी पदांची ऊर्जा विभागात लवकरच भरती

२३ हजार कंत्राटी पदांची ऊर्जा विभागात भरती होणार

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 16 2018 10:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

ग्रामीण भागातील रहिवाशांचे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्‍न लवकर सुटावेत व ग्रामपंचायत स्तरावर विद्युतसेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी महावितरणतर्फे ग्रामविद्युत व्यवस्थापक ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील 23 हजार आयटीआय धारकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल, असा दावा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आयटीआय धारकांना आवश्यक असणारे प्रशिक्षण 1 सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरणाला दिल्या आहेत.सध्या नागपूर व लातूर येथे प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महावितरण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व मुख्य अभियंता विद्युत निरीक्षक या प्रशिक्षण केंद्राची संयुक्त पाहणी करणार असून या प्रशिक्षणचा कालावधी एक महिन्याचा असेल.

मीटर रिंडींग, वीज देयकांचे वाटप, ब्रेकडाऊन अटेंड , वीजपुरवठा पूर्ववत करणे, डीओ फ्युज टाकणे, फ्युज कॉल तक्रारी अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल,  नवीन जोडणीची कामे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे ग्रामपंचायतींनी करण्याचे प्रस्तावित आहे. या कामांकरिता प्रति विद्युत ग्राहक 9 रुपये शुल्क ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रतिग्राहक 9 रुपये प्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा 3 हजार रुपये यापैकी जे अधिक असेल ते महावितरणतर्फे देण्यात येणार आहे. ग्रामविद्युत व्यवस्थापकाने केलेल्या कामाच्या बदल्यात त्याला देय होणारी रक्कम देण्याबाबतची कार्यपध्दती ग्रामविकास विभागाकडून निश्‍चित करण्यात येईल. राज्यातील 3 हजार लोकसंख्येपर्यंतच्या 23617  ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.