Sat, Jul 20, 2019 15:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत भीषण आगीत 12 गोदामे खाक

भिवंडीत भीषण आगीत 12 गोदामे खाक

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:43AMभिवंडी : प्रतिनिधी

भिवंडीत गोदामांंच्या आगीचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी भंगार गोदामांना आग लागल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन येथील गोदामांना आग लागून एकूण 12 गोदामे जळून खाक झाल्याची घटना घडली. दुपारी 2.30 च्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. दरम्यान, ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असून सुमारे चोवीस तासांचा अवधी आग विझवण्यासाठी लागू शकतो, अशी माहिती भिवंडी अग्निशामक दलाचे प्रमुख डी. एन. साळवे यांनी दिली.

अ‍ॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास सुरुवातीला ही लागली. त्या ठिकाणी कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या दाण्यांच्या गोणी साठवलेल्या असल्याने ही आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या फ्रिज, एसी, पंख्यांचा साठा केलेल्या गोदामात पसरली. ही आग एवढी भयानक होती की धुराचे लोट उंच आकाशात झेपावत होते. खबरदारीचा उपाय म्हणून नारपोली पोलिसांनी घटनास्थळावरील गर्दी कमी करून विभागातील विद्युत पुरवठा खंडित केला. आगीचे कारण अस्पष्ट असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.