Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुर्भेे स्थानकात भरसकाळी तरुणीचा विनयभंग!

तुर्भेे स्थानकात भरसकाळी तरुणीचा विनयभंग!

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:35AMकोपरखैरणे/ऐरोली : पुढारी वार्ताहर 

तुर्भे रेल्वेस्थानकामध्ये घणसोलीसाठी लोकलची वाट पाहत असलेल्या तरुणीला  नरेश जोशी  नावाच्या नराधमाने अचानक मिठी मारून आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणार्धात सावध होत तरुणीने या नराधमाला ढकलून दिल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारी सकाळी प्लॅटफॉर्मवर गर्दी असताना हा प्रकार घडल्याने रेल्वे स्थानकांवरील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळीच आरोपी  नरेश जोशी (43) याला मुसक्या आवळून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुर्भे रेल्वे स्थानकाच्या दोन व तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर एका मुलीची छेडछाड होतानाचा  व्हिडिओ शुक्रवारी दूरचित्रवाहिन्यांवर दाखवला गेला. ही 21 वर्षीय तरुणी प्लॅटफॉर्मवरून चालत असताना नरेशने मागून येऊन तिला पकडले आणि तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ही तरुणी भांबावून गेली. आरोपीने कुठलाही विचार न करता पीडित मुलीवर झडप घातलेली दिसते. त्याही स्थितीत तिने नरेशला ढकलून दिले आणि काही न घडल्याच्या आविर्भावात नरेश तेथून शांतपणे निघून गेला. आरपीएफचे पथक सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. साहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी. के. शर्मा यांनी हे फुटेज पाहताच आरपीएफचे कॉन्स्टेबल नीलेश दळवी आणि राहूल कुमार यांना तात्काळ या तरुणाच्या मागावर पाठवले. या कॉन्स्टेबलने आधी तरुणीची भेट घेतली. तिने सांगितलेल्या दिशेने कॉन्स्टेबलने पाठलाग सुरू केला. 

प्लॅटफॉर्म क्र. 2 आणि 3 च्या सबवे मध्येच नरेशच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला जीआरपी वाशीच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर भादंवि कलम 354-ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोर्‍हे यांनी तुर्भे रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शेखर सागर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.

भारतीय दंड संहिता 554, 509 यात आरोपीला न्यायालीयान कोठडी सुनावल्यानंतर त्याला काही दिवसातच जामीन मिळतो, असे पोलीसांचे म्हणणे असते. अशा घटनेतील आरोपींची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासायला हवी.

हा आरोपी जामिनावर सुटला तर असे प्रकार पुन्हा करू शकतो. तक्रारदार पिडीत मुलीवर हल्ला करू शकतो त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यासाठी पोलिसांनी सरकारी वकिलांना विनंती करावी, असे मत डॉ. निलम गोर्‍हे यांनी मांडले. 

हार्बर मार्गावर चार महिन्यांत तिसरी घटना 

सीवुड रेल्वे स्थानक परिसरात एका मेडीकल कॉलेजच्या तरुणीला रात्रीच्या वेळी लोकलमधून फेकण्याची घटना चार महिन्यांपुर्वी घडली होती. वाशी रेल्वे स्थानकांतुन एका अल्पवयीन मुलाला पळवून नेण्यात आले. रात्रीच्या वेळी धावत लोकलमधून मोबाईल खेचणार्‍या टोळ्या ही याच स्थानकांत रेल्वे तिकिट काढून कार्यरत असतात. त्यात आता गुरुवारी तुर्भे रेल्वे स्थानकात झालेल्या विनयभंगाची भर पडली.