होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वस्त धान्य दुकानांत तूरडाळ फक्‍त पस्तीस रुपये किलो

स्वस्त धान्य दुकानांत तूरडाळ फक्‍त पस्तीस रुपये किलो

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून यापुढे 55 रुपयांऐवजी प्रतिकिलो 35 रुपयांप्रमाणे तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कर्नाटक व तामिळनाडूमध्ये अनुक्रमे 38 रुपये आणि 30 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे तूरडाळ विक्री केली जाते. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कमीत कमी किमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्थांद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्‍त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. 

सातारा येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. शासनाकडून सातारा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्‍नित रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेस सलग 25 एकर जागा आवश्यक असते. गरजू रुग्ण व वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. अन्‍न भेसळ व सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या अन्‍नसुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरी स्वराज्य संस्थेकडे कार्यरत असलेल्या अन्‍न निरीक्षकांना अन्‍न व औषध प्रशासनामध्ये (एफडीए) अन्‍नसुरक्षा अधिकारी (गट-ब) या संवर्गामध्ये सामावून घेण्यात आले आहे.