मुंबई : विशेष प्रतिनिधी
व्यापार्यांनी शेतकर्यांची लूट करु नये यासाठी केंद्र सरकारने खरीप हंगामातील तुर 5 हजार 450 रुपये प्रति क्विंटल हमी भावाने खरेदी करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली आहे. शेतकर्यांकडील तुर खरेदीसाठी राज्याच्या पणन विभागाने विविध ठिकाणी 166 खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज पडल्यास आणखी केंद्रे सुरु केली जातील, असा दिलासा पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
व्यापार्यांनी शेतकर्यांची लुट करु नये, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहुन हमीभावाने तुर खरेदी करण्याची परवानगी मागितली होती. राज्याच्या पणन विभागाने त्यासाठी 13 आणि 27 डिसेंबर 2017 रोजी पत्रे पाठविली होती. या पत्रांची दखल घेत केंद्र सरकारने राज्याला 19 जानेवारी 2018 रोजी पत्र पाठविले असून 5 हजार 450 रुपये प्रति क्विटंल या दराने 4 लाख 46 हजार 800 मेट्रीक टन तुर खरेदी करण्यास परवानगी दिली असल्याचे पणन मंत्री देशमुख यांनी सांगितले.