Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिरंगा यात्रेने ‘संविधान बचाव’ला उत्तर

तिरंगा यात्रेने ‘संविधान बचाव’ला उत्तर

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 1:17AMमुंबई : खास प्रतिनिधी

भारताचे संविधान इतके शक्तिमान आहे की, त्यास धक्का लावण्याची कुणी हिंमत करणार नाही आणि ते वाचविण्यासाठी तुमच्यासारख्यांची गरजही नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.विरोधकांची संविधान नव्हे, तर पक्ष बचाव रॅली होती, असेही त्यांनी सुनावले. विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपाने काढलेल्या तिरंगा एकता यात्रेत ते बोलत होते.  

कमला मिलची जमीन मॉलसाठी देताना संविधान बचावसाठी रॅली काढणार्‍यांचे वेगाने चाललेले हात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देताना कसे मंदावतात, याचा अनुभव या महाराष्ट्राने गेल्या पंधरा वर्षांत घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

संविधान बचाव रॅलीसाठी 18 पक्ष एकत्र येऊनही केवळ 1800 लोक जमवू शकले आणि एकट्या भाजपाने जेव्हा तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी लोकांना आवाहन केले, तेव्हा कामगार मैदान गच्च भरले आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सर्वोत्तम संविधान दिले असून ते बळकट असल्यानेच भारत हा लोकशाही देश बनला, शेजारी देशांसारखी स्थिती भारतात नाही.  इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाही पायदळी तुडवली मात्र लोकांनी त्यांना निवडणुकांमध्ये नाकारले. संविधानाच्या ताकदीचा अनुभव इंदिरा गांधींनी त्यावेळी घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले. याच संविधानामुळे नरेंद्र मोदी यांच्यासारखा एक मागासवर्गीय चहाविक्रेता देशाचा पंतप्रधान होऊ शकला, आणि नेमके हेच विरोधकांना खटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

संविधान बचाव रॅलीतून विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ !

मुंबई : विशेष प्रतिनिधी

संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी विरोधकांनी एकजूट दाखवित सत्ता बदलाचा नारा दिला. या मूक रॅलीमध्ये ‘मोदी हटाव,देश बचाव’च्या घोषणा देण्यात आल्या. सुरुवातीला या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र ऐनवेळी रॅलीला परवानगी दिल्याने ही रॅली शांततेत पार पडली. 

काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे विविध गट आणि डाव्या पक्षांनी एकत्र येत संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले होते. खा. राजू शेट्टी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. शरद पवार, शरद यादव, डी. राजा, ओमर अब्दुल्ला, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, खा. राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे आदी नेते रॅलीत सहभागी झाले होते. 

रॅली मॅजेस्टिक आमदार निवासमार्गे गेट वे ऑफ इंडियाला पोहोचली. रॅलीत कोणतीही भाषणे झाली नाहीत. गेट वेवर उभारलेल्या मंडपामध्ये बसून प्रमुख नेत्यांनी मूकपणे निषेध व्यक्त केला. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला साथ देणारे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते अर्जुन डांगळे हे सेनेचा हात झटकून पुरोगामी आघाडीच्या कळपात सामील झाले. कवाडे यांच्याबरोबर रिपाइंचे अन्य गटही रॅलीत सहभागी झाले होते.