Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › .....या गावात ‘टॉयलेट-एक लढा’च ठरला

.....या गावात ‘टॉयलेट-एक लढा’च ठरला

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 8:52AMमुंबई : प्रतिनिधी

आरे कॉलनीतीर वारली आदिवासी बांधवांना सीएसआर फंडातून बायो टॉयलेट मिळाले खरे. मात्र पशुवैद्यकीय महाविद्यालयाने ते जप्‍तही केले. मिळालेली ही शौचालये परत मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांनी महाविद्यालयावर मोर्चा काढला. अखेरीस महाविद्यालयाने ही शौचालये परत केली, मात्र ती वापरण्यासाठी विद्यापीठाच्या परवानगीची अट घातली आहे. टॉयलेट एक प्रेमकथा, या चित्रपटाच्या धर्तीवर आरेतील आदिवासींसाठी टॉयलेट एक लढा अशीच स्थिती झाली आहे. 

गोरेगाव येथील आरे कॉलनीत पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात नवसाचा पाडा ही आदिवासी वस्ती आहे. वारली जमातीचे लोक या वस्तीत राहतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे आदिवासी बांधव शौचालयांची मागणी करीत आहेत. अखेरीस सीएसआर फंडातून 22 फेब्रुवारी रोजी या पाड्याला चार शौचालये मिळाली.  मात्र पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने ही शौचालये जप्‍त केली होती. बुधवारी स्थानिक रहिवाशांनी अंगावर टॉवेल गुंडाळत, हातात टमरेल आणि कडुनिंबाच्या काड्या घेऊन महाविद्यालयाच्या दिशेने कूच केली. या निषेध मोर्चात महिला आणि बालके यांनीही सहभाग घेतला होता. घटनेचा आदर करा, असा मजकूर लिहिलेले फलक मोर्चेकर्‍यांनी हातात घेतले होते. 

यासंदर्भात महाविद्यालयाचे पी. एल. धांडे म्हणाले, त्यांची स्थिती पाहून शौचालये नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतरच ते या शौचालयांचा वापर करु शकतात. त्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी हा निर्णय दुरुस्त करु शकतात किंवा फेटाळू शकतात. दरम्यान हे मोठाले बायो टॉयलेट्स महाविद्यालय आवारातून नवसाचा पाडा परिसरात डोक्यावरुन नेण्यात आले. त्यावेळी आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्‍लोषात त्यांचे स्वागत केले. 

यासंदर्भात श्रमजीवी उपाध्यक्ष प्रकाश भोईर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान लोकप्रिय होत असताना, आदिवासी बांधवांना शौचालयाचा वापर करण्याच्या हक्‍कासाठी लढा द्यावा लागत आहे, हे दु:खद आहे.