Wed, Nov 14, 2018 12:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'ऑक्सिजन'साठी मुंबईकरांचे 70 हजार मिस्ड कॉल्स

'ऑक्सिजन'साठी मुंबईकरांचे 70 हजार मिस्ड कॉल्स

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:39AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांना जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन हा बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच आरेच्या जंगलातील वृक्षापासून मिळत असतो. हे आरेचे जंगल म्हणजे मुंबईची फुप्फुसे. परंतु तीच आता मेट्रोच्या कारशेडसाठी नष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुमारे साडेतीन हजार झाडांवर कुर्‍हाड चालवली जाणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी राबविलेल्या मिस्ड कॉल मोहिमेत अवघ्या आठवडाभरात 70 हजारांवर अधिक नागरिकांनी मिस्ड कॉल करून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

युवा शक्ती एकता मंचाने ही मोहीम सुरू केली आहे. त्यात 08030630959 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले आहे. विकासाच्या नावाखाली मुंबईकरांसाठी ऑक्सिजनचा उगमस्थान असलेले जंगलच उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय आरेचा बचाव करता येणार नाही, असे सांगतानाच मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष सूरज सिंग यांनी केली आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर आपल्याला आरे बचाव मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल मंचाकडून एक आभाराचा मेसेज येतो. तसेच हा मेसेज इतरांनाही पाठवा अशी विनंतीही मंचाने केली आहे.