Sun, May 19, 2019 14:18
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळ्या जादूच्या उपचारात आईने घेतला मुलीचा बळी

काळ्या जादूच्या उपचारात आईने घेतला मुलीचा बळी

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 2:10AM

बुकमार्क करा

विरार : वार्ताहर

आजारी मुलीला रुग्णालयात नेण्याऐवजी तिला काळ्या जादूने बरे करण्याच्या नादात जन्मदात्री आईनेच तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली. यात मुलीच्या मावशीनेही आपल्या बहिणीला सहकार्य केले असून मुलीच्या वडील व भावानेही बघ्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरार पूर्व मनवेलपाडा येथील आई जीवदानी प्रसन्न इमारतीत अंबाजी भेकरे (35) हे पत्नी मीनाक्षी (30) व दोन मुलांसह राहतात. मीनाक्षीची बहीण माधुरी शिंदे (32) हीही त्यांच्याकडे राहायची. त्यांची 11 वर्षीय मुलगी सानिया हिला शौचाचा त्रास होता. तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी तिच्यावर घरगुती उपचार करण्यात येत होते. या उपचारांनी तिला गुण येत नव्हता. शनिवारी रात्री (16 डिसेंबर) आई मीनाक्षी हिने, माझ्या अंगात देवी आली आहे, मी आता सानियाला पूर्णपणे बरी करणार असे सांगून, तिच्या अंगावर हळद-कुंकू टाकले आणि तिच्या अंगावर बसून तिचे पोट दाबू लागली. ती सानियाच्या तोंडात आणि गुप्तांगात हात घालून अघोरी इलाज करू लागली. सानियाने गडबड करू नये, म्हणून तिची मावशी माधुरी हिने तिचे हात-पाय पकडले तर मीनाक्षीने तोंड दाबून धरल्याने सानियाचा गुदमरून मृत्यू झाला. यावेळी तिचे वडील व तिचा भाऊ यश (14) देखील तेथे उभे होते.

सानियाची हालचाल बंद झाली, तेव्हा ती आता उठून बसेल असे सांगत मिनाक्षीने सानियाच्या मृतदेहाजवळच पूजा करण्यास सुरुवात केली. मात्र, सकाळपर्यंत सानिया न उठल्याने त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून ती मरण पावल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची विरार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून सानियाचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठवून दिला. सानियाचा मृत्यू श्‍वास गुदमरून झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सानियाची आई, वडील, भाऊ आणि मावशीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बळीराम बनकर हे फिर्यादी बनले आहेत. या तिघांनाही वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली.