Tue, Apr 23, 2019 10:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपचारास विलंब : भावी इंजिनीअरचा मृत्यू

उपचारास विलंब : भावी इंजिनीअरचा मृत्यू

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:05AMधारावी : वार्ताहर

सायन रुग्णालयातील एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने 19 वर्षीय तेजस संजय खरे (19) या  इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. आपल्या मुलाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. 

वडाळ्याच्या कोरबा मिठागर, आनंदवाडी परिसरात राहणार्‍या तेजस याला ताप आल्याने त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ शीव रुग्णालयात बुधवारी दाखल केले. दिवसभराच्या उपचारानंतर त्याचा ताप उतरला. तेजसने डिस्चार्ज घेण्याचा तगादा घरच्यांच्या पाठी लावला. मात्र, डिस्चार्ज मिळाला नाही. तिसर्‍या दिवशी त्याने नाश्ता करताच त्याची छाती व डोके दुखू लागले. डॉक्टरांनी तात्काळ त्याचा ईसीजी काढला. तेथून आणल्यावर त्याच्या तोंडाला फेस आला आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर डॉक्टरने त्याला पाच-सहा इंजेक्शन्स टोचल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली. तोपर्यंत डॉक्टरने मात्र तेथून पळ काढला. शिवाय त्याला अतिदक्षता विभागात नेण्यासही विलंब झाला. 

अवघ्या अर्धा तासातच तेजसचा मृत्यू झाल्याचे तेजसच्या वडिलांनी सांगितल. तेजसचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांचा राग अनावर झाला त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला व सायन पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

एमआयसी विभागातील डॉक्टरांनी वॉर्डात उपचार करणार्‍या डॉक्टरवर खापर फोडण्यास सुरुवात केली. तेजसला श्वास घेण्यास  त्रास होत  होता.आयआरसीयू विभागात तातडीने हलणे गरजेचे असताना डॉक्टरांनी त्याला एमआयसी विभागात घेऊन गेले. मृत्यूला संबंधित डॉक्टर जबाबदार आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्याशिवाय शवविच्छेदन न करण्याचा निर्णय तेजसच्या नातेवाईकांनी घेतला.