Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्रॅव्हल्सचालकाचे अपहरण : फिल्मी स्टाईल कारवाई

ट्रॅव्हल्सचालकाचे अपहरण : फिल्मी स्टाईल कारवाई

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 12:53AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगरातील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून ते पैसे घेण्यासाठी आलेल्या चौकडीपैकी एकाला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्या तावडीतून अपहरण करण्यात आलेल्या व्यवसायिकाचीही सुटका केली आहे. खंडणी विरोधी पथक ठाणे व उल्हासनगर पोलिसांनी ही कारवाई केली. 

शहरातील कॅम्प नं. 1 येथील शहाड फाटक परिसरातील कोणार्क रेसिडेन्सी येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणारे नरेश रामनानी (वय 40) हे राहतात. त्यांचे केंब्रिज शोरूमजवळ कृष्णा ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ते अ‍ॅवेन्जर मोटरसायकलवरून जात असताना 24 नंबर शाळेजवळ एक चारचाकी वॅग्नर गाडी त्यांच्या मोटरसायकलला आडवी आली. यावेळी इतर 2 इसम खाली उतरून नरेश यांना आम्हाला शिवी का दिली? असे म्हणत त्याच्याशी भांडण करू लागले. तुमचा गैरसमज झाला आहे असे सांगत असतानाच दोघांनी नरेश यांना वॅग्नर गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले. गाडीमधील 3 जणांनी नरेश यांना अंबरनाथ, उल्हासनगर व डोंबिवली याठिकाणी फिरवून त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला ठार मारू, अशी धमकीही दिली. 

यावर नरेश यांनी त्यांना आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर तडजोड करून 25 लाख रुपये देण्यास सांगितले. यानंतर नरेश यांनी आपल्या मित्राला फोन करून पैशांचा बंदोबस्त करून ठेवण्यास सांगितले. नरेश यांचे अपहरण झाल्याचे व अपहरणकर्ते पैशांची मागणी करीत असल्याची माहिती त्यांनी ठाणे खंडणीविरोधी पथक पोलिसांना दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस उपनिरिक्षक ढोले, जानू पवार, पोलीस हवालदार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, संदीप भांगरे यांनी उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने सापळा तयार केला. 

अपहरणकर्ते यांनी खंडणीची रोख रक्कम कोणार्क रेसिडेन्सी बिल्डींगसमोर रस्त्याच्या ठिकाणी घेऊन येण्यास सांगितली. त्या चौघांपैकी दोघांनी  वॅग्नर गाडी काही अंतरावर उभी करून ठेवली. नरेश यांच्यासोबत 2 व्यक्तींना पैसे घेण्यासाठी पाठवले. त्याच दरम्यान पोलिसांनी सापळा रचल्याचे पाहून दोघांनी तेथून पलायन करत एकाने मोठ्या नाल्यात उडी मारली. पोलिसांनी अग्निशामन दलाच्या सहाय्याने त्याला ताब्यात घेतले तर इतर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. यानंतर पोलिसांनी नरेश यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूपपणे सुटका केली.