Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून वाहतूकदारांचा बेमुदत संप

आजपासून वाहतूकदारांचा बेमुदत संप

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी 

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेतर्फे 20 जुलैपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरूवात होणार आहे. देशामध्ये डिझेलचे समान दर, टोलदरातून सवलत मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. या संपात स्कूल बस, खासगी बस, मालवाहतूकदार, टॅक्सी यांसह इतर वाहने सहभागी होणार आहेत.

देशभरातील मालवाहतूकदारांना सध्या इंधन दरवाढ, टोल आकारणीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर केंद्र सरकारने अजून कोणताही तोडगा काढला नसल्याने अखेरीस 20 जुलैपासून संपाची हाक देण्यात आली आहे. सरकारकडे मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने संपाचा निर्णय घेण्यात येत असून संपाला तीन हजारांपेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. मालवाहतूकदार संघटनेने केलेल्या मागण्यांमध्ये देशात डिझेलचे समान दर, इंधनांवर जीएसटी सूट, वाहन विमा कमी करणे, स्कूल बसला टोल माफी, शाळांच्या आसपास पार्किंगची सुविधा, मुंबईच्या आसपासचे सर्व टोल हटवणे, स्कूल बसेसना वाहन योग्यता प्रमाणपत्र सहज मिळावे, तसेच 3 वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र द्यावे, आदी मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. या संपामध्ये महाराष्ट्रातील संघटनाही सहभागी होणार आहेत. देशातील 93 लाखांपेक्षा अधिक ट्रक-टेम्पो, 50 लाखांहून अधिक बस, टॅक्सी संपात सामील होणार आहेत.