Fri, Apr 26, 2019 01:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बरचा खोळंबा, मरे विस्कळीत

हार्बरचा खोळंबा, मरे विस्कळीत

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:58AMमुंबई : प्रतिनिधी

चेंबूर येथे रेल्वेरुळाखालील सिमेंटचे बॉक्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आल्याने मंगळवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बॉक्स बदलल्याने रेल्वेच्या वेगावर बंधने आली. हार्बरवरील रेल्वेवाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने चालू होती. मात्र ऐन गर्दीच्यावेळीच हार्बरचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून हार्बर मार्गावरील चेंबूर येथे रुळाखालील सिमेंटचे बॉक्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रुळाखालील हे सिमेंटचे बॉक्स खूप जुने असल्याने ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. 

हार्बरची वाहतूक उशिराने धावत असल्याची उद्घोषणाही करण्यात आली. मात्र रेल्वेने या कामाची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभर ही वेगमर्यादा कायम असल्याने सीएसएमटीकडे जाणार्‍या व येणार्‍या गाड्या उशिराने धावल्या.

मध्य रेल्वे कोलमडली 

एकीकडे पावसाने दमदार हजेरी लावली असताना मध्य रेल्वेची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक आसनगाव लोकलमधील तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झाली. दिवा-कोपर स्थानकादरम्यान हा बिघाड झाला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी घरी परतणार्‍या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 

काही प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून घर गाठले. दरम्यानच्या काळात जलद मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर लोकलमधील तांत्रिक दोष दूर केले. त्यानंतर या ट्रॅकवरील वाहतूक पूर्ववत झाली.

Tags : Mumbai,  Harbor Transport,  Road disrupted, Mumbai news,