मुंबई : प्रतिनिधी
मुजोर टॅक्सी व रिक्षाचालकांवर कठोर कारवाई केली जाईल. मनमानी करणार्या चालकांविरोधात तक्रार आल्यावर लगेचच कारवाई केली जाईल. प्रवाशांनी देखील त्यासाठी स्वत:हून पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केले. रिक्षा-टॅक्सीचालकांची वर्तणूक सुधारली नाही, तर प्रचलित कायद्यांचा अधिक प्रभावी वापर करून त्यांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे आनंद ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मुजोर चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. विद्या चव्हाण, प्रवीण दरेकर, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास आदी सदस्यांनीदेखील रिक्षा व टॅक्सीचालकांच्या मुजोरीचे अनुभव सांगत वाहतूक विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याकडे लक्ष वेधले.
मुजोर चालकांची वाहने जप्त केल्यास ते लगेच वठणीवर येतील. मात्र इतकी वाहने जप्त करून ठेवण्याएवढी जागा उपलब्ध नाही. राज्यात जवळपास 4 लाख अनधिकृत रिक्षा आहेत. त्यांच्यावर लगेचच कारवाई केल्यास बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल, हे लक्षात घेता अशा चालकांना रितसर परवाने घेण्यासाठी मार्चपर्यंत मुदत दिली आहे. प्रवाशांना सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी रिक्षा, टॅक्सीचे परवाने खुले करण्यात आले आहेत. परिवहन खात्यात जवळपास 40 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे गृहविभागाशी चर्चा करून वाहतूक पोलिसांबरोबरच होमगार्डची मदत चालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी घेतली जाईल. ओला आणि उबेरला सिटी टॅक्सीचा दर्जा देऊन त्या सीएनजीवर चालवणे सक्तीचे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags : Diwakar Raote, Appeal, Legislative Council, mumbai news