Thu, Apr 25, 2019 05:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्रान्स-हार्बर लिंकला मिळणार गती

ट्रान्स-हार्बर लिंकला मिळणार गती

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:01AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

दळवळणाच्या दृष्टीने मुंबई व नवी मुंबईला जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी अशा शिवडी न्हावा शेवा ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्प उभारण्यातील आर्थिक कोंडी संपली आहे. या प्रकल्पाच्या टप्पा एक व दोनच्या कामांसाठी जपानच्या जायका या वित्तसंस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. जायकाकडून कर्जस्वरुपात देण्यात येणार्‍या 15 हजार शंभर कोटीसांठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री सामंजस्य करार करण्यात आला. 

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक प्रकल्प उभारणीच्या कामातील अडथळ्यांची शर्यत जवळपास संपली आहे. विविध कारणास्तव रखडलेल्या या प्रकल्पाच्या सुमारेे 17 हजार 843 कोटी रुपये खर्चातील 85 टक्के रक्कम जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीचे (जायका) या वित्तीय संस्थेकडून कर्जस्वरुपात एमएमआरडीएला देण्यात येणार आहेत. 

या प्रकल्पाचा टप्पा एक हा 10.38 कि.मी. चा असून त्याचे बांधकाम एल अँड टी आणि आयएचआय,जपान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 767कोटी रुपये खर्च येणार आहे. टप्पा 3 हा 3.60 कि.मी. चा असून बांधकाम एल अँड टी करणार आहे त्यासाठी 1 हजार 13 कोटी 79 लाख रुपये खर्च होणार आहेत. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी  देण्यात येणार्‍या कर्जासंदर्भात एमएमआरडीए आणि जायका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, जपानचे परिवहन जमीन पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री किशी इशी, एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान, जायकाचे वरिष्ठ प्रतिनिधी ताकायोशी तांगे आदी उपस्थित होते.