होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाशी खाडी पुलावर उद्यापासून वाहतूक कोंडी

वाशी खाडी पुलावर उद्यापासून वाहतूक कोंडी

Published On: Feb 04 2018 2:22AM | Last Updated: Feb 04 2018 2:19AMमुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई आणि मुंबईला जोडणार्‍या वाशी खाडीवरील पूल दुरुस्तीसाठी शनिवारपासून अंशत: बंद ठेवण्यात आला. पुढील 15 ते 20 दिवस ही दुरुस्ती सुरु राहणार असून, पनवेल - मुंबई या मार्गावरील वाहतूक या काळात वळविण्यात येणार आहे. आठवड्याचा शेवट असल्यामुळे शनिवारी या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली नव्हती. मात्र, सोमवारपासून ही पूल दुरुस्ती वाहतुकीची चांगलीच परीक्षा घेणार आहे. 

या पुलाची दुरुस्ती 24 जानेवारीपासून सुरु होणार होती. मात्र तयारी पूर्ण न झाल्यामुळे ती 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र तोपर्यंत तयारी पूर्ण न झाल्यामुळे दुरुस्तीचे काम 4 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते, मात्र ते एक दिवस आधीपासूनच सुरू झाले आहे. 

या पुलाच्या एका बाजूने रोज एक लाख वाहने प्रवास करतात. आठवडाअखेर असल्याने वाहतूक कमी असते, त्यामुळे शनिवारपासूनच काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वाशी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. शनिवार संध्याकाळपर्यंत वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला नव्हता, आम्ही काही ठिकाणाहून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. यापुढील दिवसांतही वाहतूक सुरळीत राहील, त्यासाठी आमच्याकडे पुरेसा कालावधी आहे, असेही त्यांनी सांगितले.