Mon, Jul 15, 2019 23:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूक कोंडीने गुदमरला मुंबई-ठाण्याचा श्‍वास

वाहतूक कोंडीने गुदमरला मुंबई-ठाण्याचा श्‍वास

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:06AM

बुकमार्क करा

मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे विटावा-नवी मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे इतर मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त भार वाढल्याने आणि त्यातच लाँग वीकेण्ड आल्याने कळवा, खारेगाव, ऐरोली, शीळ कल्याण रोड, मुंब्रा बायपास, मुंबई नाशिक हायवे, घोडबंदर रोड, मुलुंड चेकनाका आदी सर्वच मार्गावर शनिवारी वाहतूक कोंडीने ठाण्याचा श्‍वास अक्षरशः कोंडला. नाताळ आणि लाँग वीकेण्डच्या सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्या ठाणेकरांना सकाळपासून वाहतूक कोंडीत तासंतास अडकून पडावे लागले. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तब्बल 2 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र शनिवारी दिसून येत होते.

ठाणे कळवा-विटावा-नवी मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर कळवा-विटावा रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्या रस्त्याचे काम शुक्रवारपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना 25 डिसेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक बेलापूर -ठाणे रोड या ठिकाणाहून पटणी जंक्शन येथून डावीकडे वळण घेऊन पटणी-ऐरोली रोडने ऐरोली नॉलेज पार्क मार्गे स्वर्गीय सुनील चौगुले चौकातून दिवा कोळीवाडा चौकातून उजवीकडे वळण घेऊन ऐरोली टोल प्लाझा येथून उजवीकडे वळण घेत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अतिरिक्त वाहनांचा मोठा भार पडला आहे. त्याचाच परिणाम शनिवारी सकाळपासूनच दिसून आला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. याचा फटका सीएसटीहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना देखील बसला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपयर्ंत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. 

नाशिककडून मुंबईकडे जाणार्‍या आणि ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तर शीळ-कल्याण रोड, मुंब्रा बायपास मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे खारेगाव ते कळवा हे 15 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 1 तासाचा अवधी लागत होता. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून मोठा फौजफाटा रस्त्यावर तैनात करण्यात आला होता. मात्र तरी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.