Fri, Feb 22, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्कायवॉकखालील मोकळी जागा पोलिसांची 'चेंजिंग रुम'

जिथे वाहतूक पोलीस रस्त्यावर बदलतात कपडे!

Published On: Dec 29 2017 11:22AM | Last Updated: Dec 29 2017 11:27AM

बुकमार्क करा
धारावी : अरविंद कटके

जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या दोन वर्षांपासून वडाळा वाहतूक पोलीस बिट चौकी बंद आहे. यामुळे वाहतूक पोलिसांवर स्कायवॉकखाली कपडे बदलण्याची नामुष्की ओढावली आहे.

डोंगरावरील अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून पोलीस बिट चौकी सुरु करावी, अशी मागणी स्थानिक मनसे शाखाध्यक्ष संजय रणदिवे यांनी केली आहे. वडाळा पूर्वेतील छत्रपती शिवाजी चौक बरकत अली नाका येथील डोंगरावर अनधिकृत झोपड्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सांडपाणी व कचरा थेट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोलीस बीटवर पडत असल्याने वाहतूक पोलिसांनी पोलीस बिट सोडली आहे. त्यामुळे या भागाला सध्या उकीरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासन यांच्यामधील सीमावादामुळे याचा फटका वाहतूक पोलिसांना बसत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. 1992 साली दंगलीच्या काळात स्थानिकांनी वर्गणी काढून वडाळा शिवाजी चौकात पोलीस बिट चौकी बांधली. नंतर शहर पोलिसांनी ती वाहतूक पोलिसाकडे सुपूर्द केली.

डोंगरावर अनधिकृत बांधकाम वाढल्याने तेथील सांडपाणी खाली टाकले जाते. चौकात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहेत. स्थानिकांच्या सोयीसाठी पोलीस बिट तत्काळ सुरु करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसेचे शाखाध्यक्ष संजय रणदिवे यांनी दिला.