Sun, Jul 21, 2019 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामंडळ वाटपानंतर फोडाफोडीचे फटाके

महामंडळ वाटपानंतर फोडाफोडीचे फटाके

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पसंख्याक विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले शिवसेना उपनेते आणि वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांचा भाजपात प्रवेश घडवून आणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे.

माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांची थेट अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंळावर नियुक्ती केल्यामुळे भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना उपनेने हाजी अराफत शेख यांनी शनिवारी रात्री नाट्यमयरित्या भाजपात प्रवेश केला. शिवसेनेत अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळत नसल्याने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शेख यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रेम दिले मात्र अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही. शिवसेनेत प्रवेश करताना वाहतूक विभागाची पूर्ण जबाबदारी देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण आजवर केलेल्या कामाचे मूल्यांकन करून आयोगाचे अध्यक्ष पद देऊन अल्पसंख्यकांचे प्रश्‍न सोडवण्याची संधी दिल्याचे शेख यांनी सांगितले. शेख यांची वाहतूक क्षेत्रात चांगली ताकद असून मुस्लीम खाटीक समाजाचे संघटन त्यांनी तयार केले आहे. त्याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.  वाहतूक सेनेचे अध्यक्ष असणार्‍या शेख यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या मागे असणारी ताकद लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते पद दिले होते. विधान परिषद देण्याचे आश्‍वासनही त्यांना देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शेख यांनी अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यांना डावलून शिवसेनेने नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांच्या नावाची शिफारस त्यासाठी केली. याामुळे शेख यांनी भाजपा नेत्यांशी संधान बांधून थेट अध्यक्षपद मिळवत शिवसेनेच्या धुरीणांना जोरदार धक्का दिला.