Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › येशूची प्रार्थना करणार्‍या कुटुंबांवर गावाचा बहिष्कार

येशूची प्रार्थना करणार्‍या कुटुंबांवर गावाचा बहिष्कार

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:48AMडहाणू : नितीन बोंबाडे

केवळ येशूच्या प्रार्थनेला जातात या क्षुल्लक कारणावरून पालघर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तक्रारी नोंदवूनही या कुटुंबांना तीन महिन्यांपासून अविरत छळ सोसावा लागत आहे. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या दुर्वेस येथील 5 आदिवासी कुटुंबे येशू प्रार्थनेला जातात. त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या विरोधानंतरही त्यांनी प्रार्थना सुरूच ठेवल्यामुळे संतप्‍त झालेल्या गावाने या कुटुंबांना वाळीत टाकले.  या कुटुंबांचे पिण्याचे पाणी तोडण्यात आले असून, त्यांना साधी रिक्षाही मिळत नाही. त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्येही बसवले जात नाही. लहान मुलांना टोचून बोलणे, त्यांना मारझोड करणे, हे प्रकार सतत सुरू आहेत. शेतीकडे जाणारे मार्गही बंद करण्यात आले आहेत. परिणामी या कुटुंबांना शेतमजुरी मिळणे बंद झाले व रोजीरोटीचाही प्रश्‍न उभा ठाकला. त्रास देणार्‍यांविरोधात पोलिसात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नाही. तहसीलदारांकडूनही अपेक्षित न्याय मिळत नाही. त्यामुळे आता दाद कोणाकडे मागावी ही विवंचना पीडित कुटुंबांना सतावत आहे.

राजू भिवा वडाली, सिराज हाल्या सुकाड, चंद्रकांत वांगड, चंदन बाबु निस्कटे, रामु पांडू खडके आदींसह आम्ही तहसीलदार, पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली. मनोर पोलिसांनी चौकशी  करून मध्यस्थी केली. मात्र, अद्याप परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही, अशी प्रतिक्रिया बाबल्या काटेला यांनी पुढारीला दिली.