होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्यटन मंत्री रावल जमिनीच्या वादात!

पर्यटन मंत्री रावल जमिनीच्या वादात!

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पुणे येथील एमआयडीसीमधील जमीन खरेदी प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ याच पक्षाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हेसुध्दा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. रावल हे भूमाफिया असल्याचा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून खडसेंप्रमाणे त्यांचीही मत्रीमंडळातुन हकालपट्टी करा, अशी मागणीही केली आहे.

राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले, रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक शेतकर्‍याच्या जमीनी कवडीमोल दराने बळकाविल्या आहेत. धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा.

2006 मध्ये बहाणे गावामध्ये पंचरत्ना रावल या नावाने 4 हेक्टर जमीन खरेदी केली. त्या जमीनीवर 1 कोटी रुपयांचा मोबदला घेतला असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी 20 एप्रिल 2012 रोजी 1.76 हेक्टर जमीन 2 लाख 83 हजार रुपयांना खरेदी केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची 27 एकर जमीन बळकावली आहे.रावल यांच्याबाबत लेखी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत परंतु मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत आहेत शिवाय एसीबीवरही कारवाई न करण्याबाबत दबाव आणत आहेत, असाही आरोप मलिक यांनी केला.

शिंदखेडामधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे 2009 मध्ये करण्यात आले. त्यावेळी काही शेतकर्‍यांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. योग्य मोबदला मिळाला नसल्यानेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याचे मलिक म्हणाले.