Tue, Jul 16, 2019 00:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत विद्यार्थिनीवर अत्याचार

डोंबिवलीत विद्यार्थिनीवर अत्याचार

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:02AMडोंबिवली : वार्ताहर

अल्पवयीन मुलगी दुकानातून परतत असताना ओळखीचा फायदा घेत वॉचमनने तिच्या तोंडावर रूमाल टाकून तिला बेशुद्ध केले आणि दोन साथीदारांच्या मदतीने पीडितेला एका वाहनात कोंबून परिसरातील एका झाडीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक डोंबिवलीत घटना घडली आहे. नराधमांच्या कचाट्यातून कशीबशी सुटका झाल्यानंतर तीन दिवसांनी या मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार पालकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत लोकराज थापा या नराधमासह दोघांचा शोध सुरू केला आहे.

 फरार थापाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडित मुलगी कांचनगाव (खंबाळपाडा) परिसरात राहते. सोमवारी, 14 मे रोजी रात्री 9 च्या सुमारास पोटात दुखत असल्याने गोळी घेण्यासाठी घरापासून जवळ असलेल्या दुकानात ती गेली होती. मात्र दुकानात गोळी न मिळाल्याने ती पुन्हा घराच्या दिशेने परतत होती. इतक्यात ठाकुर्ली भवनाच्या बाजूला असलेल्या राजाराम कुटीर येथे वॉचमनची नोकरी करणारा ओळखीचा लोकराज थापा भेटला. गेल्या काही दिवसांपासून त्याची या मुलीवर वाईट नजर होती. याचवेळी थापाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने या मुलीला पकडून तोंड रूमालाने दाबले. 

त्यानंतर रूमालातील औषधाच्या साह्याने तिला बेशुद्ध केले. एका वाहनात टाकून या मुलीला पश्चिमेकडे बावन्नचाळीतील निर्जनस्थळी एका झाडी-झुडपांनी वेढलेल्या खंडहरमध्ये नेले. तोपर्यंत ही मुलगी थोडीफार शुद्धीवर आली होती. थापाने या मुलीला व तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीने मुलगी भयभीत झाली. ही संधी मिळताच थापाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर थापाने आपल्या साथीदारांसह तेथून पळ काढला. कशीबशी घरी परतलेली मुलगी प्रचंड भेदरली होती. घरच्यांपासून तिने ही बाब लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरुवारी दुपारी घरच्यांसह सदर पीडित मुलीने टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाचे कथन केले. तिच्या जबानीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.