Sat, Jul 04, 2020 21:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टॉपटेन भारतीय भाषांमध्ये मराठी तिसरी

टॉपटेन भारतीय भाषांमध्ये मराठी तिसरी

Last Updated: Feb 27 2020 2:45AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठी भलेही महाराष्ट्राची मायबोली असेल आणि भलेही ती महाराष्ट्राची राजभाषा आहे. या राजवस्त्रांमुळे मराठीला मात्र आजवर सिंहासन लाभलेले नाही. गेल्या 50 वर्षांपासून मराठी बोलणारांचा टक्‍का महाराष्ट्रातच घसरत चालला असून देशात सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून हिंदी, तर मराठी मात्र थेट तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे भाषिक जनगणनेचा ताजा म्हणजे 2011 चा अहवाल सांगतो. 

हिंदी ही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. ती अघोषित, अनधिकृत राष्ट्रभाषा आहे. हिंदी राजभाषाही नाही. हिंदी ही भाषा रोजगार देखील देत नाही. हिंदीमुळे कुणाचे अडते याचा कुठलाही पुरावा नाही. मात्र, बकाल हिंदी भाषिक राज्यातून पोटापाण्यासाठी झुंडीच्या झुंडीने दाहिदिशांना स्थलांतर करणार्‍या हिंदी भाषिकांना देशाची भाषा संस्कृती बदलून टाकली. दुसर्‍या राज्यात जाताना स्थलांतरीत केवळ भाषा घेऊन जात नाही. सोबत अत्यंत संसर्गजन्य असे राहण्या-खाण्या-पिण्याचे आणि वागण्या-बोलण्याचे संस्कारही तो नेत असतो. यातून देशभरातील भाषांवर इंग्रजीप्रमाणे हिंदीचेही संकट घोंघावते आहे. 2011 च्या भाषा आणि मातृभाषा गणनेनुसार आज घडीला भारतात सर्वाधिक 43.63 लोक हिंदी बोलतात. 2001 आणि 2011 दरम्यान हिंदी बोलणार्‍यांची संख्या  25 टक्के वेगाने वाढली. या काळात 100 दशलक्ष नवे हिंदी भाषिक निर्माण झाले.  याच अहवालानुसार मराठी भाषा ही भारतात सर्वाधिक बोलली जाणाारी तिसर्‍या क्रमांकाची भाषा आहे. बंगालीचा क्रमांक दुसरा लागतो. बंगाली आणि मराठी अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावरील हिंदीपासून या क्रमांकांचे अंतर कितीतरी खाली आहे. हिंदी बोलणार्‍यांचा आकडा दुहेरी तर बंगाली आणि मराठी बोलणार्‍यांचा आकडा एकल आहे. 

बंगालीचे गौडबंगाल आणि गुजरातीचे राज्य

2011च्या भाषा जनगणनेनुसार बंगालीने सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून दुसरा क्रमांक राखला आहे. हिंदीप्रमाणे बंगाली मंडळींचे स्थलांतरी विविध राज्यांत आहे आणि ही भाषा दक्षिणेकडे आणि पश्‍चिमेकडेही पसरते आहे. पश्‍चिम बंगालपासून प्रचंड दूर असलेल्या महाराष्ट्रात 4.4 लाख बंगाली आहेत. दिल्‍लीतही त्यांची संख्या 2.2 लाख आहे. दक्षिणेत त्यांची संख्या कमी असली तरी केरळात बंगाली बोलणार्‍यांची संख्या 9 पट वाढली आहे. 

आता गुजरातींचे उदाहरण घ्या. गुजरातींमुळेच गुजरात-महाराष्ट्राचे विभाजन होऊन 2 राज्ये झाली. मात्र, गुजराती भाषेचा मुंबईतील वरचष्मा कायम आहे. सर्वाधिक गुजराती बोलणार्‍या शहरामध्ये मुंबई हे पाचवे मोठे शहर आहे. इंग्रजीचा वरवंटा फिरत असतानाच  हिंदी आणि गुजरातीचेही मोठे आव्हान मराठीसमोर उभे ठाकले आहे. सर्व इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्‍तीचे करणारा कायदा राज्य विधिमंडळाने बुधवारी पारीत केला. यामुळे इंग्रजी शिकणार्‍यांना मराठी शिकवले जाईल, इतकाच त्याचा उपयोग. मात्र इंग्रजी हीच जागतिक व्यवहाराची आणि त्यातही नोकरी देणारी भाषा असल्याने आता महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून केंद्रीय बोर्डाच्या शाळा सुरू कराव्या असे वाटू लागले आहे. महाराष्ट्राच्या उद्याच्या पिढ्या इंग्रजी संपन्न होण्यासाठी अशा शाळांची मदत होणार असली तरी मराठीची घसरगुंडी कशी रोखणार याकडे मात्र शिक्षण खात्याचे लक्ष नाही आणि मराठी पालकांकडून मराठीचीच उपेक्षा कधीपासूनच सुरू झाली असल्याने मराठीचा टक्‍का आणखी किती खाली जाऊन तळ गाठणार हा मोठा भयप्रत प्रश्‍न मायबोलीसमोर उभा आहे.