होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत लेप्टोने घेतला 27 वर्षीय इंजिनीअरचा बळी

मुंबईत लेप्टोने घेतला 27 वर्षीय इंजिनीअरचा बळी

Published On: Jul 22 2018 1:24AM | Last Updated: Jul 22 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत लेप्टोने 27 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. लेप्टोचा मुंबईतील हा सहावा बळी मृत्यू ठरला आहे. भांडुप पूर्व इथे राहणार्‍या सिद्धेश माणगावकर या व्यवसायाने इंजिनीअर असणार्‍या तरुणाचा लेप्टोस्पायरसीस मुळे शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

गेल्या शुक्रवारी 13 जुलै रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सिद्धेश ऑफिसहून घरी आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनी, हृदय, फुफ्फुस असे एक एक अवयव निकामी होत गेले आणि अखेरीस शुक्रवारी सिद्धेशने अखेरचा श्वास घेतला.

लेप्टाचे आतापर्यंतचे बळी 

जून महिन्यात झालेल्या पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी काही सखल भागात पाणी साचल्याने अशा पाण्यातून बाधा झाल्याने 26 जूनला कुर्ला येथील 15 वर्षीय मुलाचा लेप्टोने बळी घेतला. लगेच दुसर्‍या दिवशी 27 जूनला गोवंडी येथील 27 वर्षीय तरुणाचा आणि त्याच दिवशी मालाड येथील एका 21 वर्षीय महिलेचाही लेप्टोने बळी घेतल्याची घटना समोर आली. जुलै महिन्यात आतापर्यंत तीन जणांचे लेप्टोमुळे प्राण गेले. वरळी येथे राहणार्‍या 17 वर्षीय मुलाचा शनिवारी मृत्यू झाला तसेच प्रतीक्षानगर येथील 42 वर्षीय नागरिकाचा सायनच्या सोमय्या रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत सहा जणांचा लेप्टोमुळे बळी गेला आहे.