Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्या मुंबईत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

उद्या मुंबईत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत वांद्य्रातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना या आंदोलनात सहभागी होता येणार नाही त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी केले आहे. राज्यभर आंदोलन होणार असले तरी ते शांततेच्या मार्गाने व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. 

9 तारखेला पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे. गेल्यावर्षी याच दिवशी मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा काढण्यात आला होता. परंतु, या मोर्चाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही. त्यामुळे राज्यभर स्थानिक ठिकाणी नियोजन होईल त्या पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, मराठा आंदोलनात उसळलेला हिंसाचार पहाता हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे, असा निर्णय रविवारी पुण्यात समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ठिय्या, रास्तारोको, धरणे, निदर्शने आदी पध्दतीने हे आंदोलन होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान मुंबई 9 तारखेला पुन्हा बंद करण्यात येणार का? याबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी मुंबईत बंद किंवा रास्ता रोको करण्याऐवजी उपनगर जिल्हााधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.