Fri, May 24, 2019 21:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात आरक्षणासाठी टोमॅटो फेक आंदोलन

ठाण्यात आरक्षणासाठी टोमॅटो फेक आंदोलन

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:49AMठाणे : खास  प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना विठोबाची पूजा करू देणार नाही, ही केलेली घोषणा ठाण्यातील आंदोलनकर्त्यांनी खरी करून दाखवली. ठाण्यातील ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रतीकात्मक विठोबाची पूजा करण्यापासून मुखवटा धारण केलेल्या मुख्यमंत्र्यांना रोखून त्यांच्यावर टोमॅटो फेकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 

वारकर्‍यांमध्ये साप सोडण्याचे, चेंगराचेंगरीतून जीविताला हानी पोहोचवण्याचे आंदोलकांचे मनसुबे आहेत, त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूरच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कारणांमुळे मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना आरक्षण लागू करण्यासाठी सद्बुद्धी मिळो, असे गार्‍हाणे घालत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने विठोबाची पूजा केली. 

त्याचवेळी मुख्यमंत्री विठोबाच्या पूजेसाठी गाडीतून उतरलेले पाहून कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मुख्यमंत्री परत जा, मुख्यमंत्री परत जा, अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवले. अचानक त्यांच्यावर टोमॅटो फेकण्यात आले आणि मराठा समाजाची माफी मागा, अशी मागणी करण्यात आली. अखेर आंदोलनकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज, वारकर्‍यांची माफी मागितली आणि ते पूजा न करता परत निघून गेले. त्यानंतर भाविकांकडून विठोबाची पूजा करण्यात  आली आणि आंदोलनकर्त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची घोषणा व्हावी, असे विठोबारायाकडे साकडे घातले.