होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये शौचालय कोसळून दोन ठार

भांडुपमध्ये शौचालय कोसळून दोन ठार

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:43AMभांडुप ः वार्ताहर

भांडुपच्या टँकरोड परिसरातील पाटीलवाडीमध्ये शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान एक सार्वजनिक शौचालय कोसळून  लोबाबेन धीरूभाई जेठवा (42), बाबुलाल झोमाजी देवासे (45) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे धोकादायक शौचालयांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत दोघेही याच परिसरात राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी नागरिक शौचालयात गेले असता अचानक शौचालय कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता. स्थानिकांनी याची माहिती पोलीस प्रशासन, पालिकेचे आपत्कालीन विभाग, अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मलबा उपसून आत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाने राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांनी श्वान पथकासह बचाव कार्याला सुरुवात केली. 

20 शौचकूप असलेल्या या शौचालयाचा मलबा काढताना यंत्रणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सहा तासांनी श्वान पथकांनी दोन मृतदेह असलेल्या जागा शोधल्या. तेथून मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आले.  त्यांची ओळख पटवून राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी मोठ्या संतापाचे, भीतीचे वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त परिमंडळ सातचे उपायुक्त अखिलेशकुमार सिंग देखील घटनास्थळी उपस्थित होते. 

मृत लोबाबेन धीरूभाई जेठवा यांना एक मुलगी,  एक मुलगा असून त्या घरीच कपड्याचा धागा कटिंग करण्याचे काम करीत होत्या. तर बाबुलाल झोमाजी देवासे यांना चार मुले असून त्यांचे एक छोटे कपड्याचे दुकान आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानखुर्द, चेंबूर, विद्याविहारमध्ये देखील  शौचालय कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना याआधी घडल्या होत्या. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
 

Tags : Mumbai, mumbai news, Bhandup, Toilets collapse, Two killed,