Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलच्या महिला डब्यात टॉयलेटची सुविधा?

लोकलच्या महिला डब्यात टॉयलेटची सुविधा?

Published On: Sep 01 2018 9:50AM | Last Updated: Sep 01 2018 9:49AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो महिला प्रवास करतात. या ट्रेनच्या प्रवासामध्ये गर्दीसोबत महिला प्रवाशांना टॉयलेटची समस्या सतावत असते. रेल्वे स्थानकावर असलेल्या शौचालयांची दुरवस्था अधिक असल्याने महिला या शौचालयांचा वापर करत नाहीत. परिणामी अनेक आरोग्यविषयक समस्यांनी महिला प्रवासी त्रस्त आहेत. याची दखल घेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे मंत्रालयाकडे डब्यात शौचालय असावे अशी मागणी करणारे पत्र पाठवले होते. याची दखल घेत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सकारात्मकता दाखवल्याने टॉयलेटचा प्रश्‍न सुटणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई लोकलमध्ये कासरा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व डहाणू रोड ते चर्चगेट या प्रवासासाठी साधारणपणे दोन ते अडीच तासाचा अवधी लागतो. कधी तांत्रिक बिघाडामुळे अजून वेळ लागतो. दरम्यानच्या काळात टॉयलेटचा प्रश्‍न निर्माण झाल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असते. महिलांना होणारा हा त्रास पाहता शिवसेना खासदार अरविंद सावंत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात टॉयलेट असावेत अशी मागणी केली होती. या पत्राला उत्तर देत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही मागणी विचाराधीन असल्याचे कळवले आहे.

टॉयलेटचा प्रश्‍न पाहता महिलांची फार कुचंबणा होताना दिसते. महिलांचा हा त्रास लक्षात घेता मी रेल्वेमंत्र्यांकडे लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्ब्यात टॉयलेट असावेत अशी मागणी केली असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. राईट टु पीच्या सुप्रिया जाण यांच्या म्हणण्यानुसार, उचलण्यात आलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. कारण वेगवेगळया स्तरावरील लोकांनी या मागण्या उचलून धरणे महत्त्वाचे आहे. महिलांसाठी लोकलमध्ये टॉयलेट असावे ही मागणी आहेच मात्र याच सर्व काम होणार कसे हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व समावेशक गोष्टींचा विचार असणे गरजेचे आहे.