मुंबई : दिलीप सपाटे
राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर रविवारी, 16 तारखेला होत आहे. सकाळी 11 वाजता राजभवन येथे नव्या अकरा मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे तरुण आमदार डॉ. संजय कुटे, अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, औरंगाबादचे अतुल सावे, यवतमाळच्या राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, सांगलीतील सुरेश खाडे आणि मावळचे आमदार संजय भेगडे यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार आहे.
शिवसेनेकडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील, तर उस्मानाबादचे शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश निश्चित मानला जात आहे. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रिपदी संधी मिळणार आहे. त्यांना सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते.
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी लोकायुक्तांनी त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मेहता यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांनी आपले मंत्रिपद वाचावे म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. त्यांचे खाते आशिष शेलार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
दिलीप कांबळेंना मिळणार बढती
याशिवाय निष्क्रियता आणि तब्येतीच्या कारणामुळे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनाही वगळण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे मंत्रिपदही जाणार आहे. त्यांच्या जागी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यमंत्री म्हणून निष्क्रिय ठरले असतानाच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असलेले सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्याचे निश्चित झाले आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर विस्तार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 17 तारखेपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. शुक्रवारी त्यांना विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्याशी विस्तारावर चर्चा केली. त्यानंतर विस्तारासाठी सोमवारी सकाळचा मुहूर्त निश्चित झाला. रामदास आठवले यांनी तर शनिवारी सकाळीच अविनाश महातेकर यांची राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे जाहीर केले. भाजपचे आठ, शिवसेनेचे दोन तर रिपाइंकडून एक जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने या मंत्र्यांना जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी खांदेपालट करून मुख्यमंत्री निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. हा विस्तार करताना प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विखे, क्षीरसागर, शेलार कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार आहे. त्यांच्याकडे चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले कृषी खाते दिले जाऊ शकते. त्यांची सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणी मात्र नाकारण्यात आली आहे. मुंबईत भाजपला चांगले यश मिळवून देणार्या शेलार यांचाही समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून होणार आहे.
नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर हे देखील कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ घेतील. त्यांना सार्वजनिक आरोग्य खाते देण्यास या खात्याचे प्रभारी असलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांचाही विरोध आहे. त्यांना कोणते खाते मिळते, याबाबत उत्सुकता आहे. डॉ. अशोक उईके यांना आदिवासी विकास खात्याचे मंत्री केले जाणार असल्याचे समजते.
औरंगाबादमधून अतुल सावे की प्रशांत बंब यांना मंत्रिपद द्यायचे, यावर भाजपमध्ये विचार सुरू होता. मात्र, अतुल सावे यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे मराठवाड्याला विस्तारात क्षीरसागर, सावे आणि तानाजी सावंत यांच्या रूपाने तीन मंत्रिपदे मिळणार आहेत. बुलडाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. कुटे यांची नियुक्ती निश्चित मानली जात होती. तर, डॉ. बोंडे आणि उईके यांच्या रूपाने विदर्भालाही तीन नवे चेहरे मिळणार आहेत.
शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय टाळला
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेत या पदासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चुरस लागली होती. उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी आमदारांना एकत्र करून शक्तिप्रदर्शन केले होते. तर, संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदावरून पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता पाहता उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय टाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे खासदारांना घेऊन रविवारी अयोध्येत जाणार असल्याने ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
विनायक मेटेंना नडला बजरंग सोनावणेंचा पाठिंबा
शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, त्यांचा समावेश करण्यात आला नाही. मेटे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बीडमधील स्थानिक राजकारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा दिला होता. प्रीतम मुंडे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. मेटे यांना हा निर्णय भोवल्याची भाजपमध्ये चर्चा आहे.