Thu, May 28, 2020 13:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, कोकणात आज अतिवृष्टी

मुंबई, कोकणात आज अतिवृष्टी

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:08AM
मुंबई/पुणे : प्रतिनिधी 

मुंबईसह उत्तर कोकणात आज अतिवृष्टी होईल, असा इशारा  भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा अंदाजही वर्तविला गेला आहे. दरम्यान मान्सून केरळमध्येच खोळंबला आहे. 

वायू चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त ढगांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली आहे. परिणामी, राज्याच्या किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह दमदार पाऊस पडणार  असल्याची माहिती देण्यात आली. 

हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचाच असेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. वायू चक्रीवादळ बुधवारी गोव्यापासून 460 सागरी किलोमीटर, मुंबईपासून 290 सागरी किलोमीटर व गुजरातमधील वेरावळपासून 320 सागरी किलोमीटर अंतरावर होते. 

‘वायू’ शुक्रवारी पाकिस्तानच्या दिशेला

वायू चक्रीवादळ गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची दिशा बदलणार आहे. सध्या हे चक्रीवादळ उत्तर दिशेने सरकत असून, गुजरात किनारपट्टीवर धडकल्यानंतर ते उत्तर-पश्‍चिम दिशेने पाकिस्तानकडे वळणार आहे. परिणामी, दक्षिण पाकिस्तान, दक्षिण गुजरात भागात पुढील 2-3 दिवस वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

महाराष्ट्राला धोका नाही

महाराष्ट्राला वायू चक्रीवादळाचा धोका नसून मुंबई, कोकणच्या जवळ हे वादळ आल्याने मुंबई ते कोकण किनारपट्टीदरम्यान बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील 3-4 दिवस पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे. 

मान्सून चार दिवसांपासून केरळमध्येच खोळंबला

नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) गेल्या चार दिवसांपासून केरळमध्येच खोळंबला आहे. 8 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला. पुढील दोन दिवसांत त्याने संपूर्ण केरळ राज्य व्यापले. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे त्याची पुढील वाटचाल रखडली असून, कर्नाटकात त्याने बुधवारी प्रवेश केला नाही. बुधवारी उत्तर केरळमधील कन्नूरमध्येच त्याची उत्तर सीमा (नॉर्दन लिमिट) कायम होती. दरम्यान, चक्रीवादळाची तीव्रता शुक्रवारी कमी होणार असून, त्यानंतर पुढील आठवड्यात पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.