Wed, Jun 26, 2019 23:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून मुंबई, कोकणात दोन दिवस पाऊस

आजपासून मुंबई, कोकणात दोन दिवस पाऊस

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी

हवामान खात्याने आता रविवारपासून दोन दिवस मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात वरुण राजाने जराशी लवकरच हजेरी लावली. मात्र दुसर्‍या आठवड्यात त्याने दडी मारली आणि पुन्हा घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे.

आता मुंबईसह कोकण पट्ट्यात 17 आणि 18 जूनला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मोसमी पावसाची संततधार सुरू होणार नसून आणखी किमान एक आठवडा मोसमी पाऊस पुढे सरकणार असल्याचे केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

मोसमी वारे सुरू झाले की पश्चिम किनारपट्टीवर पावसाची संततधार लागते. यावेळी नऊ जून रोजी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाला तरी शनिवारचा अपवाद वगळता पावसाच्या केवळ एक- दोन सरी येत आहेत. पुढील काही दिवसांत दक्षिण कोकणात पावसाच्या सरींची संख्या वाढणार असून रविवारी व सोमवारी मुंबईतही पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार सरीही येतील. राज्याच्या इतर भागात मात्र पावसाच्या केवळ तुरळक सरी येतील. हा पाऊस दोन दिवसांचा पाहुणा असून पावसाची संततधार लागण्यासाठी मात्र आठवड्याहून अधिक काळ लागेल.

मोसमी पावसाने आठ जूनला राज्यात प्रवेश केला होता, नऊ जूनला मुंबईपर्यंत मजल मारली होती तर 12 जूनपर्यंत विदर्भात पोहोचला होता. मात्र त्यानंतर मोसमी वार्‍यांची प्रगती थांबली असून आणखी आठ दिवस तरी मोसमी पावसाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. केरळमध्ये वेळेआधी दाखल होऊन राज्यात वेळेत पोहोचलेल्या मोसमी वारे कमकुवत होण्यामागे जागतिक हवामानातील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. वार्‍यांचा मंदावलेला वेग तसेच समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र नसल्यानेही मोसमी वार्‍यांच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो. मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाने यापैकी कोणत्याही कारणाला दुजोरा दिलेला नाही.