Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपकडून रणशिंग; डिसेंबरात लोकसभा निवडणुकीची शक्यता

भाजपकडून रणशिंग; डिसेंबरात लोकसभा निवडणुकीची शक्यता

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी

भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने होणार्‍या महामेळाव्याची  तयारी पूर्ण झाली आहे. हा मेळावा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून फुंकले जाणारे रणशिंगच असेल. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या सरकारवर व नेत्यांवर विरोधकांकडून केल्या जाणार्‍या आरोपांचा पक्षाध्यक्ष अमित शहा या मेळाव्याच्या माध्यमातून समाचार घेतील. पक्षाच्या नेत्यांकडूनच या मेळाव्यात विरोधकांना सडेतोड उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

भाजपने यापूर्वी 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतच विराट महागर्जना रॅली घेतली होती. या रॅलीनंतरच देशात व राज्यातही सत्ता परिवर्तन झाले होते. त्यानंतर भाजपचा सत्तेचा रथ देशभर दौडतच राहिला.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपवर होणार्‍या टीकेचा रोख वाढला आहे. नोटा बंदी व जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर अर्थव्यवस्थेची गती मंद झाल्याचा आरोप केला जात असून, व्यक्‍तिगत आरोप करून विरोधकांनी भाजपच्या नेत्यांना टार्गेट  केले आहे. 

केंद्रातील आघाडीतील घटक पक्षांचीही नाराजी वाढली असून महाराष्ट्रात भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेली शिवसेना सत्तेत असूनही टीकेची एकही संधी सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्‍तिगत टीका करून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. देशातील विविध राज्यात निरनिराळ्या आंदोलनांनी भाजप सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष अमित शहा हे विरोधकांचा समाचार घेतील व भाजपचा संदेश कार्यकर्त्यांमार्फत घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्ज करतील .

बुथ पातळीवर भर 

या महामेळाव्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. बीकेसीवर सुमारे अडीच ते तीन लाख लोक बसतील, असा मंडप घालण्यात आला आहे. एका विधानसभा मतदार संघात कमान 300 ते 350 बूथ असतात. भाजपने गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतच बूथवाईज कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारली आहे. ‘एक बूथ 25 यूथ’ अशी पक्षाची घोषणा असून, अमित शहा यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बूथ पातळीवरील नियोजनावर भर देत पक्षकार्याचा विस्तार केला आहे. त्यामुळेच बूथ पातळीवरील राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते या महामेळाव्यासाठी आणण्याची तयारी भाजपने केली आहे. 

28 रेल्वे व 50 हजार वाहनांचा ताफा कार्यकर्त्यांसाठी सज्ज असणार आहे. त्याशिवाय बांद्रा, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वेने येणार्‍या कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी येणार्‍या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार, खासदार व पक्ष पदाधिकार्‍यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ करण्यात आले आहे. 

डिसेंबरात लोकसभा निवडणुकीची शक्यता

लोकसभेच्या निवडणुका या 2018 च्या डिसेंबरमध्ये घेतल्या जातील, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यासाठी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र अमित शहा देतील. पक्ष कार्यकर्त्यांनी  राबवायची  संपर्क  मोहीम व जनतेसमोर मांडण्यासाठीच्या मुद्द्यांची शिदोरी घेऊन कार्यकर्ते गावागावांत परततील व पक्षाचा कार्यक्रम जनतेसमोर मांडतील, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. अमित शहा यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे माजी अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई शहरातून 50 हजार कार्यकर्ते या मेळाव्यासाठी यावेत, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

tags : mumbai, mumbai news, Today preparation, BJP rally,