Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पॉलिटेक्निक’चे प्रवेश आजपासून 

‘पॉलिटेक्निक’चे प्रवेश आजपासून 

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 12:43AMमुंबई : प्रतिनिधी 

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या तंत्रनिकेतन अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेशास 21 जूनपासून सुरुवात होत आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात  1 लाखाहून अधिक जागा आहेत. ऑनलाईन पद्धतीने 16 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. 

राज्य सीईटी सेल व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याची अधिसूचना सोमवारी काढण्यात आली आहे. दहावीनंतर तीन वर्ष तंत्रनिकेतन केल्यानंतर अभियांत्रिकीची पदविका घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. मात्र, आता या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली आहे. गेल्यावर्षी तब्बल 80 हजार 835 जागा मोठ्या प्रमाणात रिक्‍त राहिल्या होत्या. यंदा किती जागा आहेत? याची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. यंदाही प्रवेशाच्या तीन फेर्‍या होणार आहेत. तर चौथी विकल्प फेरी होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 16 जुलै अखेर मुदत आहे. 17 जुलै रोजी प्राथमिक तर 21 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 28 ऑगस्टपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या नियमित वर्गांना प्रारंभ होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी या प्रक्रिया 21 जून ते 16 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पूर्ण करावयाचे आहेत. खुल्या वर्गासाठी 400 तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. प्रवेश अर्जासोबत मिळालेल्या लॉगिन किटच्या आधारे www.dtemaharashtra.gov.in/poly 2018 या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. 

रिक्‍त यंदा तरी जागा भरतील?

पॉलिटेक्निकच्या दरवर्षी मोठ्या संख्येने रिक्‍त राहणार्‍या जागा यंदा तरी भरल्या जातील का असा प्रश्‍न आहे. दहावीनंतर वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाकडे आणि त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांडे वळण्याचा ट्रेंड तयार होत असल्याने तंत्रनिकेतन महाविद्यालयांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यंदा दहावीचा निकाल गेल्यावर्षी पेक्षा कमी लागला आहे. त्यामुळे यंदा तरी जागा भरणार का हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी 80 हजारहून जागा रिक्‍त राहिल्या होत्या.