होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला आज पालिका मोर्चाचा फटका बसणार

मुंबईला आज पालिका मोर्चाचा फटका बसणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

बायोमेट्रिक हजेरी बंद करा, गटविम्याचा त्वरित निर्णय घ्या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी पालिका कर्मचारी सोमवारी दुपारी 2 वाजता पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यात पाणी खात्यासह घनकचरा विभाग व हॉस्पिटल कर्मचारी मोर्चात सहभागी होणार असल्याने मुंबईतील पाणीपुरवठा व रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

कामचुकार कर्मचार्‍यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचा हजेरी पट सुधारला आहे. पण बायोमेट्रिक हजेरीपूर्वी कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळांचेे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांचे बॅँकेत पगारच होत नाही. तर काहींच्या खात्यात जेमतेम 200 ते 300 रूपये पगार जमा होतो. याचा सर्वाधिक फटका हॉस्पीटल कर्मचार्‍यांसह अभियांत्रिकी, घनकचरा विभाग, चिटणीस विभागातील कर्मचार्‍यांना बसतो. त्यामुळे बायोमेट्रीक हजेरी बंद करा, अशी मागणी  लावून धरली आहे. 

गटविम्याच्या बाबतीतही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.जुलै 2017 मध्ये ही योजना बंद झाल्यानंतर तब्बल 8 महिने लोटूनही गटविम्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांचे लाखो रूपयांची वैद्यकीय बिल पडून आहेत. विमाकंपन्या 145 कोटी रूपये प्रिमियम मागत आहेत.पण एवढे प्रिमियम देणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने 114 कोटी रूपये देण्याचे मान्य केले. पण अजूनही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी प्रशासनाच्या विरोधात सोमवारी रस्त्यावर येणार आहेत. या मोर्चासाठी  सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा, साफसफाई, रूग्णसेवा व अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र या संपाचा पालिकेच्या कोणत्याच सेवांवर परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, बायोमेट्रिक हजेरीमधील त्रुटी दूर करून गटविम्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Tags : Palika Morcha, hit,  Mumbai, Today, mumbai news


  •