Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे बंद

आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे बंद

Published On: Jul 25 2018 1:57AM | Last Updated: Jul 25 2018 1:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन भडकले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी मुंबई बंदची हाक दिली आहे. या बंदमधून रुग्णालये, भाजीपाला, दूध, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालयांनाही सूट देण्यात आली आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले आहे. 

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरला आहे. मंगळवारी राज्याच्या विविध भागांत बंद पाळण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर राजधानी मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाली. या बैठकीत चर्चेअंती बुधवारी 25 जुलैला मुंबई बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून करण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीबाबत मराठा समाजाच्या भावना दुखावणारे आणि समाजाला बदनाम करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या निषेधाचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीत राज्यातील अन्य भागाप्रमाणे मुंबईतही बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या वक्तव्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने मेगा भरती स्थगित ठेवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मराठा मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले, मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढल्यानंतरही मराठा समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मुंबईत निघालेल्या अतिविराट मोर्चानंतर सरकारने आम्हाला मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. मागील आठ दिवसांपासून परळी येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु असताना त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले.उलट वारीला न जाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले ते मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले. मराठा मूक मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात होण्यास सर्वस्वी सरकारच कारणीभूत आहे, असेही पवार म्हणाले. या बैठकीनंतर नवी मुंबईतही बंद पाळण्यात येणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय माथाडी कामगारांनी घेतला आहे. तेथील अन्य व्यवहारही बंद ठेवले जातील. ठाणे जिल्ह्यातही विविध भागात बंद पाळण्यात येणार असून कल्याण येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यातही मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत राहील असे सांगतानाच बंदला सर्व समाजाने पाठींबा द्यावा, असे आवाहनही या बैठकीनंतर करण्यात आले. दरम्यान मुंबई बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सोेशल मिडीयावरही पोलिसांची नजर रहाणार आहे. 

ठाणे जिल्हा बंदची हाक

ठाणे : मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीमुळे राज्यभरात तीव्र आंदोलनाची ठिणगी पडली आहे. मंगळवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी न झालेल्या मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईत बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. संपूर्ण शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करताना मराठा समन्वकांनी शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक वाहतूक, व्यापारपेठा बंद ठेवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

आज नवी मुंबई आणि पनवेल बंद

बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एसटी गाड्यांवर दगडफेक न करण्याचे आवाहन आंदोलन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडचा समावेश आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये यासाठी भाजीपाला आणि फळ मार्केटला बंद मधून वगळण्यात आले आहे. नवी मुंबई पार पडलेल्या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील, अंकूश कदम, प्राची पाटील, राहूल पवार आदी समन्वय उपस्थित होते.