Sun, May 26, 2019 12:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हापूसची आज मुंबईत पाच कोटींची गुढी!

हापूसची आज मुंबईत पाच कोटींची गुढी!

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 12:52AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

आंबा म्हणजे फळांचा राजा. हिवाळा सरु लागला की खवय्यांना हापूस आंब्याचे वेध लागतात. यावर्षी ओखी वादळ आणि वातावरणातील बदलाचे सावट हापूसच्या आगमनावर होते. मात्र तरीही फळांचा हा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. वर्षाच्या पहिल्या अर्थात गुढीपाडव्याच्या सणावर हापूसचा चांगलाच प्रभाव राहणार आहे. यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई एपीएमसीत पाच कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता फळ व्यापार्‍यांकडून व्यक्‍त केली जात आहे. अर्थात गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. हापूसची आवकही गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मेच झाली आहे.

गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातील हापूस आंब्याने बाजी मारली होती. पाडव्याला 50 हजार आंबा पेट्यांची आवक एपीएमसीत झाली होती. मात्र यंदा कोकण हापूसची आवक 50 तर केरळ हापूसची आवक तब्बल 80 टक्क्यांनी घटली आहे. त्यातच पाडवा 15 दिवस लवकर आल्याने आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पेटीमागे 1500 रुपये दर वाढल्याने हापूसची चव सर्वसामान्यांसाठी आंबट झाली आहे. पाडव्याला 425 घाऊक व्यापारी सुमारे 5 कोटींचा हापूस विक्री करण्याची शक्यता घाऊक व्यापारी व एपीएमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना व्यक्‍त केली.

फळ मार्केटचे उपसचिव ईश्‍वर मसराम यांना विचारले असता ते म्हणाले, मार्केटमध्ये हापूसची आवक घटली आहे. 400 व्यापार्‍यांकडे एकही हापूस आंबा पिकलेला नाही. त्यामुळे किरकोळ व्यापारी कच्चा हापूस घेवून तो पिकवतात. यंदा एप्रिलनंतर आवक वाढेल. मुंबई एपीएमसीत कोकण हापूसची गेल्या आठवड्यापासून 15 ते 18 हजार पेट्यांची आवक सुरू झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर ती 25 हजार पेटीपर्यंत जाईल. यावर्षी अलिबाग आणि बाणकोट हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दोन वर्षांपासून या जिल्ह्यांतून अल्प प्रमाणात हापूस येत होता. गेल्या वर्षी  कोकणातून 17 मार्चला हापूसची 50 हजार पेट्यांची आवक झाली होती. ती यंदा 25 हजार पेट्यांपर्यंत घसरली आहे. 25 मार्चनंतर हापूसची आवक वाढण्यास सुरू होईल, त्यानंतर 10 एप्रिलपासून 15 मेपर्यंत मुबलक प्रमाणात सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल, या दरात हापूस चाखण्यास मिळेल, अशी माहिती व्यापारी पानसरे यांनी दिली.

यंदा गुढीपाडवा 15 दिवस लवकर आल्याने गेल्या वर्षीसारखी परिस्थिती यावेळी नाही. पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस हा महागच राहील. घाऊक बाजारात व्यापार्‍यांना 1200 ते 1300 रुपये डझन उत्तम प्रतीचा माल खरेदी करावा लागला आहे. त्यामुळे हमाली, खोके, गवत व इतर खर्च एकत्र केल्यानंतर व्यापारी ती पेटी 1800 ते 2 हजार रुपये दराने विक्री करेल. दक्षिण भारतातही हापूसचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे कर्नाटक हापूस 15 ते 20 एप्रिलनंतर सुरू होईल. आवक अशीच सुरू राहिल्यानंतर पुणे, अहमदाबाद, मुंबई, राजकोट, सुरत येथील घाऊक बाजारात हापूसला तेजी असणार आहे. त्यामुळे दरही टिकून राहातील.

Tags : Today, Hapus, mango, turnover, five crore rupees, Mumbai news