Sat, Jul 20, 2019 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरदार महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार

नोकरदार महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

नोकरी-व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव येथे स्वतंत्र महिला वसतिगृह बांधण्याचे ठरविले आहे.  मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणारे हे पहिले महिला वसतिगृह असणार आहे. गोरेगाव पश्‍चिम येथील रेल्वे स्टेशनजवळील महापालिकाच्या भूखंडावर 17 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अंदाजे 350 महिलांना राहण्यायोग्य 170 खोल्या असणार आहेत.सदर इमारतीत सभागृह, स्वयंपाकगृह, पाळणाघर अशा विविध अद्ययावत सुखसोयी करण्यात येणार आहेत. 

तसेच मुंबई परिसरात वृध्दांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव पूर्वेकडील जयकोच रोडवरील महापालिकेच्या भूखंडावर सुमारे 100 वृध्द नागरिकांसाठी निवारा व देखभालीची सोय उपलब्ध करुन देणारा वृध्दाश्रम बांधण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. या वृध्दाश्रमातील नागरिकांना वैद्यकीय तपासण्या,  औषधोपचार करणारी आरोग्य सेवा महापालिकेकडून पुरविली जाणार आहे. 

महिला वसतिगृह व वृध्दाश्रमासंदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली होती. यावेळी स्थापत्य समितीच्या अध्यक्षा साधनाताई माने, महापालिका उपायुक्त किरण आचरेकर, सहायक पालिका आयुक्त डॉ. संगीता हसनाळे, चंदा जाधव , कार्यकारी अभियंता संजय पंडित उपस्थित होते.

महिला वसतिगृह व वृध्दाश्रमासाठी नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांची मदत घ्यावी  आणि केंद्रामध्ये अद्ययावत सोयीसुविधा कशा पुरविता येतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.