Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी टिटवाळा पोलिसांवर गुन्हा

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी टिटवाळा पोलिसांवर गुन्हा

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:43AMटिटवाळा : वार्ताहर 

टिटवाळा पश्‍चिमेकडे वासुन्द्री रोडवर असलेल्या साई प्रसाद या सोसायटीत राहणार्‍या 21 वर्षीय मितेश जगताप या तरुणाने  23 ऑगस्ट 2017 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करत मितेशच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने याची दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृत मितेश हा आपल्या दुचाकीसह काही दिवसांपूर्वी टिटवाळा पोलिसांना परिसरात आढळून आला. त्यावेळी पोलीस चौकशी करत असताना त्याच्या दुचाकीला नंबरप्लेट नसल्याचे  आढळून आले. त्याच्याकडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर आपली गाडी गॅरेजमध्ये काम करण्यासाठी दिली होती, म्हणून नंबरप्लेट काढून ठेवली, असे मितेशने सांगितले. त्यानंतर मितेशचे वडील राजेश जगताप यांनी गाडीची कागदपत्रे आणून दाखवल्यानंतर पोलिसांनी त्याची दुचाकी परत दिली. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडून त्याचे जॅकेट आणि मोबाईल काढून घेतला होता. जॅकेट आणि मोबाईल घेण्यासाठी वारंवार  टिटवाळा पोलीस ठाण्यात जाऊनही पोलिसांनी मितेशला अट्टल गुन्हेगारासारखी वागणूक देत त्याला मानसिक त्रास देण्यात आला. मितेश आपले जॅकेट व मोबाईल मागण्यासाठी जात होता, तेव्हा तेव्हा पोलीस कर्मचारी राठोड व सुळे हे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते. याच जाचाला कंटाळून मितेशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत  चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेतली होती.त्यानुसार हायकोर्टाने याबाबत टिटवाळा पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले होते. यावर बुधवारी पुष्पा जगताप यांचे वकील अ‍ॅड. तन्वर निझाम यांनी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच खंडणी यासारखे आरोप असतानाही अद्याप एफआयआर दाखल झाली नसल्याची बाब युक्तीवादात उघड केली. यावर आता कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे व पोलीस नाईक अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.