Tue, May 21, 2019 18:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवजयंतीचा बॅनर काढल्याने टिटवाळ्यात तणावाचे वातावरण

शिवजयंतीचा बॅनर काढल्याने टिटवाळ्यात तणावाचे वातावरण

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:29AMटिटवाळा : वार्ताहर

अहमदनगरमधील भाजपचा माजी उपमहापौर छिंदम याने छत्रपती शिवरायांबद्दल काढलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर जनप्रक्षोभ उसळलेला असतानाच गोवेली परिसरात असलेले शिवजयंतीचे टिटवाळा राजे नामक ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर भाजपच्याच  नगरसेवकाच्या कामगाराने काढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ बंद देखील पुकारण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त राजे ग्रुप संस्थेच्या वतीने टिटवाळा येथील गोवेली चौकात शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. सदर बॅनर उल्हासनगरचे नगरसेवक राजेश वधारीया यांच्या कामगारांनी काढल्याचे समजताच राजे ग्रुप आणि त्यांच्यात वाद झाला.  उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे नगरसेवक असलेल्या राजेश वधारिया यांच्या सांगण्यावरून  शुभेच्छा बॅनर काढल्याचे कामगारांनी सांगितले. यामुळे संतप्त नागरिकांनी  टिटवाळा पोलीस ठाण्यात जावून नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी गर्दी केली  होती. राजे ग्रुपने भाजप नगरसेवक वधारीया याचा निषेध करत दुपारी टिटवाळा बंद पुकारला. याबाबत टिटवाळा पोलिसांची संपर्क साधला असता,  वधारीया यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल,असे सांगितले.