Tue, Nov 19, 2019 13:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतीचे वाण घेऊन 'त्याने' मिटवली गरिबांची भूक

सतीचे वाण घेऊन 'त्याने' मिटवली गरिबांची भूक

Published On: Jun 17 2019 5:32PM | Last Updated: Jun 17 2019 5:32PM
टिटवाळा :  अजय शेलार 

काही माणसे नुसतीच जगतात तर काही आपल्या मिळालेल्या जीवनाचे सार्थक करत आपल्यासह इतरांचेही जगणे श्रीमंत करतात. ‘सोशल बार्बर’ तसेच कैचीने हास्य फुलवणारा जादुगार अशी ओळख असलेले केशकार्तनकार आणि समाजसेवक म्हणून ओळख असलेले टिटवाळ्यातील रवींद्र बिरारी यांच्याबाद्दलही असेच काहीसे म्हणावे लागेल. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला सुवासिनी स्त्रियांकडून अर्पण करण्यात येणारे आंबा, फणसाचे गरे, केळी यांसारखी फळे असलेले वाण एकत्रित गोळा करून हे गरीब वस्तीतील मुलांना खाण्यासाठी देण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम बिरारी यांनी ३ वर्षांपासून चालू केला होता. याबाबत त्यांनी अनेक महिलांना प्रबोधनही केले होते. त्यांच्या या उपक्रमाला यावर्षी उदंड प्रतिसाद मिळाला.

यावर्षी एकूण ४२ महिलांनी दिलेल्या वाणातून १७५ पुरणपोळया जमा झाल्या रविंद्र बिरारी यांनी त्या गरीब वस्तीत जावून वाटप केले. आपल्या समाजिक दृष्टीकोनातून नेहमीच अभिनव संकल्पना राबवत बिरारी यांची समाजसेवा चालू असते. वट पौर्णिमेनिमित्त सौभाग्यवती आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी, दिर्घआयुष्यासाठी आणि सात जन्म आपल्या पतीची आपल्याला सोबत मिळावी अशी श्रद्धा ठेवत वडाला प्रदक्षिणा घालत विविध फळे असलेले वाण नैवैद्य वडाच्या झाडाला अर्पण करतात. मात्र यात ठेवलेली फळे, अन्न पदार्थ हे पावसाच्या पाण्याने अथवा माशा बसून, मुंग्या लागून खराब होतात. अथवा त्याची नासाडी होते. 

तर एकीकडे अनेक जणांना आपल्या पोटाची भ्रांत मिटवण्यासाठी वणवण करावी लागते, भंगार विकून मोलमजुरी करून दोनवेळच्या जेवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. म्हणूनच या वाण ठेवण्याच्या श्रद्धेला कुठेही धक्का न लावता यातूनच  काहीतरी चांगले करावे या हेतून आपण हे सतीचे वाण दान करण्याची संकल्पना ३ वर्षांपूर्वी चालू केल्याचे बिरारी यांनी सांगितले आहे. आपण यावर्षी  वाणाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले अन्न हे गरीब वस्तीत वाटले. माझी ही संकल्पना अनेक महिलांना आवडली असून आपण पुढच्या वर्षी आपल्या इतर मैत्रीणींना या संकल्पनेला सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याचे यावेळी उपस्थित स्त्रियांनी सांगितले.

वटपौर्णिमेनिमित्त वाहिलेल्या वाणाची फळे गोळा करून आदिवासी पाड्यातील मुलांना वाटणे,  तर कधी रेल्वे स्टेशनवर वास्तव्य करणारे अपंग, निराधार वृद्ध व मानसिक संतुलन बिघडलेले लोक यांची मोफत केस दाढी कापून त्यांना स्वच्छ करणे असे काम असो ते गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहेत आणि म्हणूनच कैचीने हास्य फुलवणारा जादुगार अशीच त्यांची ओळख झाले आहे. आतापर्यंत १००० हून जास्त लोकांच्या जीवनात त्यांनी आपल्या कैचीने हास्य फुलवले आहे.

हे काम करत असताना अनेकदा त्यांच्यावर मनोरुग्ण व्य्कातींकडून जीवघेणे हल्लेही झाले. भिकाऱ्यांच्या अंगावर असलेल्या जंतुमुळे त्यांना संसर्ग होऊन ते आजारी पडले त्यांचे पाच किलो वजन अचानक कमी झाले. पण बिरारी यांनी त्यांचे काम आजतागायत चालू ठेवले आहे. आपल्या व्यवसायाने हाती आलेल्या कैचीचा केवळ पोटापाण्याच्या  व्यवसायासाठीच वापर न करता त्या बरोबरच समाजातील वंचित दिन- दुबळ्या रस्त्यावरील बिरारी यांना अनेक मनोरुग्ण, भिकारी आणि अंध, अपंग व्यक्ती केस आणि दाढी वाढलेल्या, ओंगाळवाण्या अवस्थेत असणाऱ्या लोकांचे केस दाढी मोफत कापतात.  त्यांना स्वच्छ करून  चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी धडपडणाऱ्या टिटवाळ्यातील रवींद्र बिरारी यांच्या या अनोख्या समाजकार्याची रिलायन्स जिओ कपंनीने दाखल घेत त्यांच्या समाज कार्यावर द सोशिअल बार्बर (THE SOCIAL BARBER ) ही एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. ती सध्या युटयूबर प्रसिद्ध आहे. त्यांच्या या शॉर्ट फिल्मचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.                               

याबद्दल रवींद्र बिरारी यांना विचारले असता 'पैशानीच सर्वांना मदत करता येते असे नाही . आपला उद्देश जर प्रमाणिक असेल तर आपल्याकडे जे आहे त्यानेही अनेकांना समाधान देता येते' असे त्यानी सांगितले .