Fri, Dec 13, 2019 18:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत

तर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत

Published On: Jun 16 2019 4:41PM | Last Updated: Jun 16 2019 4:37PM
टिटवाळा :अजय शेलार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क म्हणजेच RTE अंतर्गत आपल्या मुलाला प्रवेश मिळाला, मात्र शाळेसाठी लागणारी पुस्तके, गणवेश आणि इतर साहित्य हे सरकारी नियमानुसार देण्यासाठी शाळा टाळा- टाळ करत आहेत. त्‍यामुळे माझ्या मुलाला कायद्यानुसार जर गणवेश मिळाला नाही तर, आपण सरकारच्या नावाने घंटा वाजवत आपल्या पाल्याला नग्न अवस्थेत शाळेत पाठवणार असल्याचे कल्याण येथील रिक्षाचालक असलेले समाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे कल्याण तालुका कार्याध्यक्ष मनोज वाघमारे यांनी म्‍हटले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क म्हणजेच RTE अंतर्गत आपल्या पाल्याचा शिक्षणाचा अधिकार डावलला जात असत्‍याचा आरोप मनोज वाघमारे यांनी केला आहे. कल्याणच्या सूचकनाका परिसरात राहणारे समाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे कल्याण तालुका कार्याध्यक्ष मनोज वाघमारे यांनी मुलाला कायद्यानुसार जर गणवेश मिळाला नाही, तर आपण सरकारच्या नावाने घंटा वाजवत आपल्या पाल्याला नग्न अवस्थेत शाळेत पाठवणार असल्याचे त्‍यांनी सांगितले आहे.

तसेच वाघमारे यांनी कल्याण पूर्व येथील आनंद ग्लोबल लोकधारा या शाळेविरुद्ध एल्गार पुकारला आहे. समता, समाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्य सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. या दृष्टीने सहा ते चौदा वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास इयत्ता मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी सरकार  RTE च्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. त्याचा फायदाही गोर-गरीब जनतेला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी होत आहे. मात्र काही शाळा याच सरकारी आदेशाला धुडकावत गोर – गरीब पालकांची पिळवणूक करत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

वाघमारे यांनी आपला मुलगा मयूर याच्यासाठी कल्याण पूर्व येथील आनंद ग्लोबल लोकधारा या शाळेत RTE अंतर्गत पहिलीच्या वर्गासाठी अर्ज केला होता. दिनांक २२ एप्रिल २०१९ रोजी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर “माझ्या मुलाला शाळेचे साहित्य गणवेश कधी मिळणार अशी” विचारणा त्यांनी केले असता, आम्ही साहित्य देणार नाही ते तुम्हालाच घ्यावे लागेल अशा स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. यावर वाघमारे यांनी RTE अंतर्गत हे देणे बंधनकारक असल्याचे सांगितले असता, तुम्ही आमच्या वरिष्ठ लोकांशी याबाबत बोला असा सल्ला त्‍यांना देण्यात आला. मात्र अनेकांशी चर्चा करूनही समाधानकारक उत्तर आणि मुलाचे शैक्षणिक साहित्यही न मिळाल्याने वाघमारे यांनी याबात कल्याण डोंबिवली महानगरपालीका शिक्षण विभागास याबाबत एका निवेदनाव्दारे साहित्य मिळवून देण्यासाठी शाळेला सूचना करण्याची विनंती केली आहे.

तर शाळा सुरु होऊनही जर माझ्या पाल्याला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर, आपण सरकारच्या नावाने घंटा वाजवत आपल्या पाल्याला नग्न अवस्थेत शाळेत पाठवणार असल्याचे सांगत वाघमारे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.